लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाने एसटीतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला, तसेच अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात सवलत दिली आहे. वय पडताळणीसाठी ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात आधारकार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे. मात्र, आधारकार्ड नसेल तर वाहन परवाना किंवा मतदान कार्डही ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे आधारकार्ड नसल्याने वाहकांबरोबर होणाऱ्या वादाला आता विराम मिळणार आहे.
आधारकार्डप्रमाणे वाहन परवाना व मतदान कार्डावर संबंधित व्यक्तीचा फोटो, तसेच जन्मतारीख, पत्ता नमूद असते. जन्मतारखेवरून वयाची पडताळणी करणे वाहकांना शक्य आहे. त्यासाठी वाहन परवाना किंवा मतदान कार्ड सोबत ठेवावे.
६५ ते ७५ वयोगटासाठी ५० टक्के सवलत ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात पन्नास टक्के सवलत दिली आहे. त्यासाठी वयाची तपासणी वाहकांना करून तसे तिकीट द्यावे लागते. त्यासाठी आधार अथवा तत्सम कार्ड सोबत असणे गरजेचे आहे.
७५ पेक्षा जास्त वय असल्यास प्रवास मोफत ७५ वर्षापेक्षा जास्त वय असल्यास अमृत ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेअंतर्गत मोफत प्रवास करता येतो. मात्र, वय पडताळणी केली जाणार आहे.
आधार नसल्यास कंडक्टरशी भांडताहेत आजोबा ज्येष्ठ नागरिकांकडे आधारकार्ड नसल्यास वाहकांबरोबर वाद होतात; परंतु वाद टाळण्यासाठी मतदान कार्ड किंवा वाहन परवाना यासाठी महामंडळाने परवानगी दिली आहे.
वय पडताळणीसाठी 'आधार' गरजेचे आधारकार्डवर फोटो, जन्मतारीख असल्याने वयाची तपासणी करून वाहकांना सवलतीचे तिकीट देणे सुलभ होते.
महाव्यवस्थापकांचे आदेश काय? ज्येष्ठ नागरिकांनी सवलत घेताना वय तपासण्यासाठी आधारकार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना यापैकी कोणतेही एक कार्ड वाहकाला दाखविणे बंधनकारक आहे.
'आधार' नसल्यास ही कागदपत्रे चालणार वाहन परवाना व मतदान कार्ड यावर फोटो, जन्मतारीख नमूद असते. शासनमान्य कागदपत्रे असल्यामुळे महामंडळाने यांना मान्यता दर्शविली आहे.