वसंत खेडेकर
बल्लारपूर : काही व्यक्तींमध्ये सदासर्वदा दांडगा उत्साह, कामात तरबेजपणा, उत्सवप्रियता वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम असते. चंद्रपूरचे माजी आमदार, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी ॲड. एकनाथ साळवे हे त्यातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व!
एकनाथरावांचे जन्मगाव बल्लारपूरजवळील बामणी हे खेडे! कास्तकार कुटुंबात जन्मलेल्या एकनाथरावांना शिक्षणासोबतच वाचनाची व लिखाणाची आवड ! विद्यार्थिदशेपासूनच ते सामाजिक कार्याकडे, परिवर्तन चळवळीकडे वळले. विधीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या एकनाथ साळवे यांनी पुरोगामी विचारांच्या चळवळी उभ्या केल्या. म. गांधीजी आणि काँग्रेसच्या विचारसरणीशी ते जुळले. सेवादलाचे कार्यकर्ते झाले. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे १९६७ व १९७२ असे ते दोनदा आमदार राहिले. काँग्रेस १९७८ ला दुभंगली. काँग्रेसचे इंडिकेट व सिंडिकेट असे दोन गट पडल्यानंतर ते सिंडिकेटकडून उभे राहिले; पण त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर राजकारणाला रामराम ठोकून त्यांनी सामाजिक परिवर्तन चळवळीकडे आपला मोर्चा वळविला. सोबतच त्यांनी लेखन केले. 'एन्काउंटर' ही आदिवासी जीवन संघर्षावर कादंबरी लिहिली. 'मी बुद्ध धम्म स्वीकारला' हे पुरोगामी विचारांचे पुस्तक लिहिले. इतरही काही पुरोगामी विचारांवर त्यांनी पुस्तके लिहिली. साहित्यासोबतच कलाक्षेत्रात उमदे रसिक म्हणून त्यांचा कोणत्याही कार्यक्रमात सक्रिय वावर असायचा. हातात पेन, कागद ठेवून ते भाषणांचे रंग कलांचे मुद्दे टिपत! मग ते साहित्य संमेलन असू दे की, नृत्य वा गायन कार्यक्रम! त्यांची रसिकता वाखाणण्याजोगी होती. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले आहे. क्रांतिसूर्य ज्योतिबांच्या विचारांना ते अग्रभागी मानत, म्हणूनच त्यांनी आपल्या शाळा-महाविद्यालयांना ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची नावे दिलीत.
बॉक्स
एसटीनेच प्रवास
एकनाथ साळवे हे दोनदा आमदार झाले होते; पण ते नेहमीच एसटी बसनेच प्रवास करीत. दोनदा आमदार राहिलेल्या व्यक्तीकडे स्वतःची कार असणे अपेक्षित. ॲड. साळवे हे मात्र याबाबत अपवाद आहेत.
बॉक्स
निळू फुलेंशी मैत्री
ॲड. साळवे यांचे वैचारिक मत प्रसिद्ध अभिनेता निळू फुले यांच्या परिवर्तनशील मताशी जुळले होते. म्हणूनच, काही वर्षांपूर्वी साळवे यांच्या नेतृत्वात बामणी येथे झालेल्या किसान जनजागृती शिबिरात निळू फुले यांनी हजेरी लावून कास्तकारांशी संवाद साधला. ते साळवे यांचे चांगले मित्र बनले.