राजू गेडाम मूलआजचे युग स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात नवनविन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे. मात्र नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त शहरी भागातील विद्यार्थ्यांना होत असतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील नवनवीन तंत्राची माहिती व्हावी, यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर (बफर) मधील फुलझरी या जंगलव्याप्त गावात शैक्षणिक जनजागृती होण्याच्या दृष्टीने ई- लर्निंगचे शिक्षण देण्याचा उपक्रम वन विभागाने पुढाकार घेऊन चालविला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे ई-लर्निंगचे शिक्षण घेऊ शकणार आहेत.मूल तालुक्यातील फुलझरी हे गाव बफरझोन परिक्षेत्रात असून सर्वत्र जंगलव्याप्त गाव म्हणून ओळखला जातो. या गावाची लोकसंख्या १९५ असून सदर गाव शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या गावात असून आदिवासी गाव असल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या फक्त १० आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नरत आहे. शिक्षणाची व्यवस्था आधुनिक पद्धतीची व्हावी यासाठी शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे फुलझरी गावातील विद्यार्थी देखील आधुनिक पद्धतीचे शिक्षण घ्यावेत, म्हणून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने ई-लर्निंग साहित्य पुरविण्यात आले. यात ई-लर्निंग साफ्टवेअर, प्रोजेक्टर, संगणक संच आदी जवळपास ७५ ते ८० हजार रुपयाच्या साहित्याचा समावेश आहे. या ‘ई’ लर्निंग अभ्यासक्रमाचा नुकताच शुभारंभ फुलझरी येथे करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने बघून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. यावरुन ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे ई-लर्निंगचा फायदा घेऊन ज्ञानात भर घालतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे शिक्षण
By admin | Updated: May 8, 2015 01:16 IST