चंद्रपूर : मागील महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. चंद्रपूर, बल्लारपूर रेल्वेस्थानकांवरून पूर्वी चिक्कार प्रवासी प्रवास करायचे. मात्र आता बोटावर मोजण्याइतके प्रवासी प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या दहशतीने दररोज ५० ते ७५ तिकिटे रद्द होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
बल्लारपूर रेल्वे जंक्शनमधून जीटी एक्स्प्रेस, दक्षिण, सिंकदराबाद, दानापूर, तेलंगणा, गौरखपूर अशा साधारणत: ट्रेनच्या ३० फेऱ्या होत आहेत. या ट्रेनने पूर्वी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे रेल्वे स्टेशनचा परिसर गजबजलेला दिसून यायचा. मात्र मागील वर्षी कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे काहीकाळ रेल्वेच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर काही अटी व शर्तीवर रेल्वेचा प्रवास सुरू करण्यात आला. परंतु, अद्यापही अनेक रेल्वे बंद आहेत. त्यामुळे आपसुकच प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यातही अनेकजण प्रवास टाळत असून दररोज ७५ ते १०० च्या जवळपास तिकिटे रद्द होत असल्याची माहिती आहे.
बॉक्स
मुंबईसाठीची ट्रेन रद्द
बल्लारपूर रेल्वे जंक्शनवरून मुंबईसाठी डायरेक्ट ट्रेन धावत होती. त्यामुळे मुंबईला ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र मागील वर्षींपासून ही ट्रेनच बंद आहे.
-आंध्रामध्ये रेल्वेचे काम सुरू असल्याने बहुतांश ट्रेनचा मार्ग वळविण्यात आला आहे. दिल्ली ते चेन्नईच्या ट्रेन बल्लारपूर जंक्शनवरून जाण्याऐवजी माजरीवरून जात असल्याची माहिती आहे.
बॉक्स
कोरोनामुळे प्रवाशाची संख्या ओसरली आहे. दररोज साधारणत: ५०च्या जवळपास तिकिटे रद्द होत आहेत. सद्यस्थितीत रेल्वेच्या ३० फेऱ्या होत आहेत. मात्र त्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी नाही.
-ओमप्रकाश कुमार, टीटीआय, बल्लारपूर
-----
प्रवाशांअभावी अनेकदा ट्रेन रद्द
सद्यस्थितीत बल्लारपूर जंक्शनवरून ट्रेनच्या ३० फेऱ्या होत आहेत. परंतु, प्रवासी कमी असल्याने बऱ्याचंदा ट्रेन रद्द होत आहेत. मात्र याबाबत प्रवाशांना सूचना नसल्याने त्याची मोठी फजिती होत आहे.