गोंडपिपरी : तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील पशुधन पर्यवेक्षकाला स्थानांतरानंतरही सोडण्यात येत नसल्याचे कारण पुढे करून वाद घालत भंगाराम तळोधी तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय रामगोनवार यांनी पंचायत समितीतील महिला कर्मचाऱ्यांना अश्लिल शिविगाळ करून बीडीओच्या कॅबीनची तोडफोड केली. हा प्रकार आज सोमवारी घडला. याची तक्रार गटविकास अधिकारी चंद्रशेखर पुद्दटवार यांनी पोलिसात दिली आहे. आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास भंगाराम तळोधी येथील पशुधन पर्यवेक्षक नारायण इंगळे यांच्या स्थानांतर व त्यांना भारमुक्त करण्याच्या मागणीसाठी भंगाराम तळोधीचे तंमुस अध्यक्ष संजय रामगोनवार हे गटविकास अधिकारी चंद्रशेखर पुद्दटवार यांच्या पंचायत समितीमधील कार्यालयातील कॅबीनमध्ये पोहोचले. यानंतर इंगळे यांच्या भारमुक्तीबाबत चर्चा सुरू असताना बाचाबाची झाल्याने गटविकास अधिकारी चंद्रशेखर पुद्दटवार हे दौऱ्याचे काम काढून तेथून निघून गेले. मात्र काही वेळानंतर संजय रामगोनवार यांनी काही कथित सहकाऱ्यांसमवेत येऊन आवक-जावक लिपीक टेबलावरील कामकाजाच्या फाईल व इतर साहित्य फेकून बीडीओ कॅबीनकडे मोर्चा वळविला. वाटेत कॅबीनच्या दरवाजापुढे उभ्या असलेल्या महिला कर्मचारी कल्पना मरस्कोल्हे हिला अश्लिल शिविगाळ करून कॅबिनमधील कुलर, बिडीओंचा टेबल व इतर साहित्याची तोडफोड केल्याचा आरोप आहे.(तालुका प्रतिनिधी)
बिडीओच्या कॅबीनमध्ये तोडफोड
By admin | Updated: August 11, 2014 23:49 IST