शहरातील विकास कामांवर चर्चा करण्यासाठी आज महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे व विषय समित्यांचे सर्व सभापती व नगरसेवक उपस्थित होते. सभा सुरू झाल्यानंतर नियम डावलून कचरा संकलन व वाहतुकीबाबत ठराव घेतल्याचा आरोप शहर विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला. मात्र, सभापती पावडे यांनी आक्षेप घेतल्याने देशमुख यांनी नारेबाजी करीत सभात्याग केला.
कंत्राटदाराने कमी दराने काम टाकले किंवा दर व्यावहारिक नसल्यास ‘रेट ॲनालिसिस’ मागविणे व त्यानंतर कार्यवाही करणे नियमानुसार आवश्यक असते. मात्र स्थायी समितीने ही प्रक्रिया धाब्यावर बसवून दोन ओळीचा ठराव घेतला व जुने कंत्राट रद्द केले. नंतर २,८०० रुपये प्रति टन दराने त्याच कंत्राटदाराला नवीन कंत्राट देण्यात आले. २०१३ मध्ये याच कामासाठी स्थायी समितीमध्ये कंत्राट मंजूर करीत असताना माहिती दिली होती. कंत्राटदाराशी तीनदा ‘निगोसिएशन’ करून दर कमी केले होते. २०१३ च्या स्थायी समितीत सात वर्षांसाठी १७ कोटी प्रकल्प किंमत गृहित धरली होती. मात्र, सात वर्षांसाठी याच कामाला ६७ कोटींचा खर्च येणार आहे, असे सांगून या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे.