भद्रावती : तालुक्यातील माजरी क्षेत्रातील ढोरवासा खुल्या कोळसा खाणीत रविवारी सकाळी ११ वाजता ओबीचे ढिगारे २०० ते ३०० फूटावरुन कोसळले. त्यामुळे कामगारांत एकच खळबळ उडाली. दुसऱ्या पाळीचे कामगार कामाला सुरूवात करण्यापूर्वी ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. पुन्हा एकदा उत्पादनाच्या लालसेपोटी कामगारांचा सुरक्षेचा कुठलाही विचार होत नसल्याचे या घटनेवरून दिसून येते.ढोरवासा खुल्या कोळसा खाणीला २००४ मध्ये उत्खननाची परवानगी मिळाली. तिचा १० वर्षांचा उत्खननाचा काळ नुकताच संपला. आता नव्याने उत्खननाचे काम वेकोलिने हाती घेतले. या खाणीत तब्बल ३५० कामगार काम करत आहेत. येथील क्षेत्र प्रबंधक व खाण प्रबंधक वरिष्ठ अधिकाऱ्यांना खूष ठेवण्यासाठी खाणीतील कोळशाचे उत्खनन क्षमतेपेक्षा जास्त करुन उत्पादनात आपण अव्वल असावे, या बेतात असतात. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा विचार न करता या अधिकाऱ्यांकडून नेहमीच आपले हित साधण्याच्या प्रयत्न केला जातो. याचे परिणाम मात्र कामगारांना भोगावे लागतात. सन २००० मध्ये माजरी क्षेत्रातील कावळी येथील अशाच दुर्घटनेत अधिकाऱ्यांचा दुर्लक्षतेमुळे मातीचे ढिगारे कोसळले होते. त्यात १० कामगारांना प्राण गमवावे लागले. असे असताना सुरक्षा सप्ताहाचे बेगडी कार्यक्रम घेवून अधिकारी दिशाभूल करीत असतात. मात्र कामगारांच्या सुरक्षेची हमी घेतली जात नाही.या खाणीतील ३५० कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी येथील क्षेत्र प्रबंधक आर. पी. सिंग, खाण प्रबंधक आर. पी. सिन्हा यांच्यावर असतानासुद्धा या खाणीत क्षमतेपेक्षा मोठमोठे ओबीचे ढिगारे रचले आहे. यामुळे होणाऱ्या दुर्घटनेचा त्यांनी विचारसुद्धा केला नाही. काही कामगार संघटनांनी याओबीच्या ढिगाऱ्याबाबत क्षेत्र प्रबंधकांना लेखी सूचना केल्या आहे. मात्र त्या विचारात न घेतल्याने ढिगारे कोसळण्याचा प्रकार घडला. २९ जूनला दुसऱ्या पाळीचे काही कामगार कामावर जाण्याच्या बेतात असताना हा प्रकार घडला. तब्बल २०० ते ३०० फुटावरील ओबीचा ढिगारा खाणीत कोसळला . क्षणाचाही विलंब झाला असता तर मोठी दुर्र्घटना घडली असती. खाणीत उभे करण्यात आलेले मोठ-मोठे ओबीचे ढिगारे कोसळल्याने वेकोलिचे कोळसा उत्पादनाचे काम ठप्प झाले आहे. (शहर प्रतिनिधी)
ढोरवासा कोळसा खाणीतील ढिगारे कोसळले
By admin | Updated: July 1, 2014 01:23 IST