सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटनचंद्रपूर : रोजगार उपलब्ध होण्यासाठी कौशल्यवान युवक घडवा, असे आपण नेहमी म्हणत असतो. वास्तविक रोजगार उपलब्ध करुन देतील अशी क्षमता निर्माण होणारे रोजगार देणारे युवक घडले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, जि.प.सभापती देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, जि.प.सदस्य ब्रिजभुषण पाझारे, प्राचार्य कीर्तीवर्धन दिक्षीत, प्राचार्य अशोक जिवतोडे आदी उपस्थित होते.ना. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदर्शनीनिमित्त जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रयोगांचे फित कापून उदघाटन केले. काही प्रयोगाची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)विज्ञान क्षेत्रात नोकरीची संधीविज्ञानानेच विकासाचा मार्ग सुकर होवू शकतो. विज्ञानातच जग जिंकण्याची ताकद आहे. त्यामुळे या विज्ञानाकडे ज्ञान प्राप्तीचा मार्ग म्हणून पाहिले पाहिजे. बालवयात कौशल्यवान युवक घडून भविष्यात हे युवक इतरांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणारे युवक म्हणून पुढे यावे. शासनाने विज्ञान तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी डिजिटल इंडिया, स्टँडअप, स्टार्टअप इंडिया आदी उपक्रम सुरु केल्याचेही यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
रोजगार देणारे कौशल्यवान युवक घडवा
By admin | Updated: August 27, 2016 00:32 IST