चंद्रपूर: येथील विद्यानिकेतन कॉन्व्हेंट तथा कनिष्ठ महाविद्यालयाकडून विविध उपक्रमाच्या नावाखाली वसुल केली जाणारे अवाजवी शुल्क रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी पालकांच्यावतीने शाळा अध्यक्षांना निवेदन देण्यात आले. पालकांचे नेतृत्व शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका कुसूम उदार यांनी केले. दरवर्षी या शाळेकडून बगीचा, इमारत फंडाच्या नावाखाली पालकांकडून पैसे घेण्यात येतात. पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर चौथीपर्यंत एकदाच हा फंड व देखभालीचा घ्यायला हवा. त्यानंतर चौथी ते सातवीपर्यंत एकदा हा फंड घ्यावा. वेळोवेळी तो वाढविण्यात येऊ नये, असा नियम आहे. मात्र हा नियम मोडून पालकांकडून पैसे वसुल केले जात आहेत. पहिली ते चौथीपर्यंत शिकवणी शुल्क म्हणून दोन हजार ५०० रुपये घेण्यात येतात. या शुल्कात काही प्रमाणात कपात करण्यात यावी, अशी मागणी यावेळी पालकांनी केली. शाळेच्या नियमानुसार प्रत्येक शाळेमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र भरमसाठी फी देऊनही या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना अकारण त्रास सहन करावा लागतो. परीक्षा शुल्क म्हणून चार हजार ५०० रुपये भरण्याचे फर्मान प्राचार्यांनी सोडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. यामध्ये देखील कपात करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. ओळखपत्रासाठी प्रती विद्यार्थी ८० रुपये घेण्यात येतात. विविध कारणांसाठी पैशाची मागणी केली जाते. ती होऊ नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)
अवाजवी शुल्क वाढ मागे घेण्याची मागणी
By admin | Updated: August 11, 2014 23:51 IST