अमरावती : शहरात मांस विक्रीची सुमारे ३०० दुकाने असून त्याकरिता महापालिका प्रशासनाने कोणतीही व्यवस्था केलेली नाही. मात्र मांस विक्रेते (खाटीक) हे खासगी, रस्त्याच्या बाजूला मिळेल त्या जागेवर व्यवसाय करतात. परंतु या मांस विक्रेत्यांना व्यवसाय करू देत नाही. त्यामुळे मांस विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. खाटीक समाजाबद्दल महापालिकेने असहिष्णुता दूर करून रोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विदर्भ खाटीक समाज सेवा समितीने केली आहे.आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना बुधवारी सादर करण्यात आलेल्या निवेदनात खाटीक समाजाने मांस विक्रीबाबत येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला आहे. मांसविक्रीसाठी संकुल, स्लॉटर हाऊस, झोननिहाय संकु लाची निर्मिती करण्यात आली नाही. मांस विक्रीसाठी सातत्याने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी सुरू असताना प्रशासनाकडून असहिष्णुतेची वागणूक दिली जाते. दुसरीकडे जागा उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे खाटीक समाज बांधव मांसविक्री करून उपजिविका करीत आहेत. परंतु महापालिकेकडून होणाऱ्या कारवाईला मांस विक्रेत्यांना सामोरे जावे लागत आहे. स्वत:च्या मालकी जागेत व्यवसाय करूनही ‘सहिष्णू’ खाटीक समाजाला प्रशासन नाहकपणे त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला. परंपरागत व्यवसायातून जाणीवपूर्वक खाटीक समाजाला परावृत्त करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उदरनिर्वाहाच्या साधनावरच टाच दिली गेल्यास जगायचे कसे? असा सवाल खाटीक समाजातील व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. मांसविक्री करताना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे. मांस विक्रीच्या अनुषंगाने लागणारी आवश्यक परवानगी, परवाना देण्यात यावा. कायमस्वरुपी व्यवस्था होईस्तोवर मांस विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करू नये, अशी मागणी श्रीराम नेहर, लक्ष्मणराव कराळे, गणेश नेहर, गणेश मदने, पुरुषोत्तम विरुळकर, सुरेश रावेकर, रमेश खंडार, राजू लोणारे, संजय माकोडे, पंजाब लोणारे, चंद्रकांत कंठाडे, पंडित हरणे, सुरेश धनवटे आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)
मांस विक्रेत्यांविरुद्ध कारवाई थांबविण्याची मागणी
By admin | Updated: December 25, 2015 01:17 IST