रेल्वेगाड्यांच्या वर्दळीने नागरिक त्रस्त : गावाची दोन भागात विभागणी लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे गाव असून १० हजारांवर लोकसंख्या आहे. गावाच्या मध्यभागातून तीन रेल्वे लाईन गेल्या असून चौथी रेल्वे लाईन प्रस्तावित आहे. रेल्वे लाईनमुळे गावाची विभागणी दोन भागात झाली आहे. येथील रेल्वे मार्गावरून दररोज १५० च्या वर रेल्वे गाड्याचे आवागमन होत असल्याने वाहतूक डोके दुखावणारी ठरली आहे. येथील रेल्वे फाटकामुळे सारेच त्रस्त असून विसापुरात रेल्वे लाईनदरम्यान उड्डानपुल देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. विसापूर गावाच्या हद्दीत बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा होवू घातली असून जागतिक दर्जाचा उद्योग पेपर मिल जवळच आहे. गावात सिमेंटच्या रस्त्याचे जाळे निर्माण झाले असून वाटचाल स्मार्ट गावाकडे होत आहे. येथे गोंडवाना विसापूर रेल्वेस्थानक गोंदिया-बल्लारपूर, भुसावळ-बल्लारपूर व काजीपेठ-नागपूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्याचा थांबा आहे. सोबतच गावातील लोकसंख्या मोठी असल्याने रेल्वे फाटकामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दर दोन तीन मिनीटाला रेल्वे फाटक बंद होते. परिणामी गंभीर रुग्णांना वेळीच उपचारही मिळत नाही. विशेष म्हणजे, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गावात असल्याने फाटकाच्या जाचाने रुग्णही त्रस्त झाले आहेत. बल्लारपूर पंचायत समितीच्या गणाचा दर्जा विसापूर गावाला असून गावाला जोडणारा दुवा म्हणजे उड्डानपुल महत्त्वाचा ठरणार आहे. मध्यंतरी गावकऱ्यांची मागणी लक्षात घेवून व माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांच्या पाठपुराव्यामुळे नागपूर विभागाच्या मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे लाईन खालून पुलाच्या जागेची पाहणी केली. मात्र त्यानंतर कागदी घोडे अडकले. येथील सरपंच रिता जिलटे यांनी ग्रामपंचायतीमार्फत सदर समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. ग्रामसभेचा ठरावही रेल्वे प्रशासनाला दिला. परंतु रेल्वे प्रशासन अद्यापही कामाला लागले नाही. यामुळे गावकऱ्यात नाराजी निर्माण झाली आहे. रेल्वे लाईनमुळे दोन भागात विभागलेल्या गावाला वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाण पुलाची गरज निर्माण झाली असून राजकीय नेत्यांनी इच्छाशक्ती जागृत करून येथील नागरिकांची समस्या निकालात काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विसापूर गाव तीन रेल्वे लाईनमुळे विभागले आहे. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. जडवाहनाच्या वाहतुकीसाठी बल्लारपूरच्या गोलपुलाच्या धर्तीवर विसापुरातही रेल्वे लाईन खालून पुलाचे बांधकाम करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला अवगत करण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानक परिसरात पादचारी लोखंडी पुलाचे बांधकाम केल्यास नागरिकांना सुविधा मिळवून दिलासा मिळणार आहे. - रामभाऊ टोंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य, विसापूर.
विसापुरात उड्डाणपुल देण्याची मागणी
By admin | Updated: May 18, 2017 01:27 IST