चंद्रपूर: केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने बैलबंडीसह तीन दुचाकी वाहन व तीन चाकी रिक्षाद्वारे अभिनव रॅली काढली. या रॅलीद्वारे कार्यकर्त्यांनी मोटारसायकली बंद अवस्थेत ढकलत नेऊन सर्वांचे लक्ष वेधले.या रॅलीत चंद्रपूर जिल्हा शहर कॉंग्रेस कमिटीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीदरम्यान भारतीय जनता पार्टी व मोदी सरकारच्या विरोधात फलक लाऊन नारेबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला. या रॅलीमध्ये चंद्रपूर जिल्हा शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, अॅड.विजय मोगरे, प्रदेश सचिव सुनिता लोढीया, महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्ष नंदा अल्लूरवार, रत्नमाला बावणे, केशव रामटेके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्थानिक आझाद बागेपासून निघालेली ही रॅली जटपूरा गेटजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ पोहचली. तेथे नंदू नागरकर यांच्या हस्ते गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली.यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढीविरुद्ध कॉंग्रेसची अभिनव रॅली
By admin | Updated: July 8, 2014 23:22 IST