चंद्रपूर: शहरातील जटपुरा गेट परिसरातील वाहतुकीच्या कोंडी सोडविण्यासाठी केंद्रिय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गेटच्या दोन्ही खिडक्या उघडण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. याला कॉंग्रेसने विरोध केला आहे. सोबतच ही समस्या सोडविण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन काही उपायदेखील सुचविले आहेत. याउपरांतही जटपुरा गेटच्या खिडक्या उघडण्यात आल्या तर प्रसंगी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यात येतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जटपुरा गेटसंबंधी वृत्तपत्रातून बातम्या वाचल्यानंतर पुरातत्व विभागाच्या नागपूर येथील विभागीय अधीक्षक नंदीनी भट्टाचार्य यांना निवेदन पाठविल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. चंद्रपूरच्या ऐतिहासिक वैभवाला विद्रूप करण्याचा हा प्रयत्न असल्याचे गावंडे यावेळी म्हणाले. जटपुरा गेट हे चंद्रपूर शहराचे प्रवेशद्वार आहे. बाहेरगावातील लोक जेव्हा चंद्रपुरात येतात, तेव्हा गेट आणि किल्ला पाहून ते हरखून जातात. शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्याचा मार्ग काढताना सर्व बाबींचा विचार केला जावा, अशी अपेक्षाही गावंडे यांनी यावेळी व्यक्त केली. स्थानिक छोटा बाजार चौकातील सिग्नलपासून जटपुरा गेटपर्यंत बॅरेकेटस् करून एका-एका वाहनाला सोडल्यास वाहतुकी कोंडी होणार नाही. फहीम गेस्ट हाऊसपासून येणारा मार्ग चौरस असल्याने वाहतूक प्रभावित होत नाही. या ठिकाणी उड्डाणपूल बनविल्यास एक मार्ग रामाळा तलाव, दुसरा कस्तुरबा रोड व तिसरा गणराज्य ट्रॅव्हल्सकडे जाऊन समस्या मार्गी लागू शकते, असे गावंडे यावेळी म्हणाले.रामाळा तलावाकडून येणाऱ्यांना चव्हाण फॅक्टरीजवळील फुटलेल्या भिंतीजवळून पुढे जाता येईल. चोर खिडकीला रुंदी करावे, आंबेकर ले-आऊट, घुटकाळा मार्गाचेही रुंदिकरण करण्यात यावे, आणि घुटकाळ्यातील वाहनांना तेथून पुढे जाऊ देऊन महसूल कॉलनी चौकात काढण्यात यावे. हे उपाय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच अंमलात आणावे. अशीही मागणी गावंडे यांनी यावेळी केली. तसे झाल्यास जटपुरा गेटवर होणाऱ्या होणारी वाहतुकीची कोंडी सुटणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
जटपुरा गेटच्या कोंडीबाबत कॉंग्रेसने सुचविले उपाय
By admin | Updated: May 20, 2015 01:44 IST