वनसडी : कोरपना तालुक्यातील विरुर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नांदगाव (सुर्याचा) येथील आरोग्य उपकेंद्रात एक महिन्यापासून स्थायी आरोग्य सेविका नसल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होते आहेत. येथे त्वरित स्थायी आरोग्य सेविका देण्यात यावी, अशी मागणी नांदगाव (सुर्याचा) च्या सरपंच छाया शंकर देठे व उपसरपंच संजय चौधरी यांनी केली आहे.या उपकेंद्रामध्ये नांदगाव, कवठाळा, निमणी, कोराडी, तळोधी, नवेगाव, खैरगाव ही सात गावे येतात. नागरिकांना आरोग्यविषयक अडचणी उद्भवल्यास नांदगाव (सुर्याचा) येथील आरोग्य केंद्रातून उपचार केले जातात. ही सर्व गावे ग्रामीण क्षेत्रात असल्याने या ठिकाणी कुठल्याच आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध नाहीत. रुग्णालयदेखील दूर अंतरावर आहे. एखादा रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत असल्यास रुग्णाला तातडीने उपचार मिळत नाहीत. परिणामी त्याचा जीव धोक्यात येतो. या ठिकाणी आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज इमारत उभी असताना स्थायी आरोग्य सेविका नसल्याने नागरिकांना उपचार कुठे घ्यावे, असा प्रश्न पडतो. याबाबत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने देण्यात आलीत. मात्र या निवेदनांना केराची टोपली दाखविण्यात आली.परिणामी येथील संपूर्ण आरोग्य सेवा आॅक्सिजनवर आहे. त्यामुळे येथे त्वरित स्थायी आरोग्य सेविकेची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
स्थायी आरोग्य सेविकेअभावी रुग्णांचे हाल
By admin | Updated: August 14, 2014 23:39 IST