घनश्याम नवघडे
२२२२
नागभीड : नागभीड तालुक्यात ४३ ग्रा.पं.ची निवडणूक होत असल्याने तालुक्यात सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण आहे.नामांकन ३० डिसेंबरपर्यंतच स्विकारण्यात येत असल्याने जो तो नामांकन दाखल करण्यासाठी धावपळ करतांना दिसत असून १८ प्रकारचे कागदपत्रे गोळा करता करता प्रत्येकाची चांगलीच तारांबळ उडत आहे. दरम्यान मंगळवारपर्यंत ७२७ उमेदवारांनी आँनलाईन अर्ज दाखल केले असल्याची माहिती आहे. आयुष्यात एकदा तरी निवडणूक लढवावी अशी अनेक सामान्य व्यक्तींची इच्छा असते. ही संधी त्यांना ग्रामपंचायतीच्या रूपाने प्राप्त होत असते. कोणी पँनलकडून तर कोणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असतात. मात्र दिवसेंदिवस निवडणूक अतिशय कीचकट होत असून निवडणुकीसाठी लागणारी कादगपत्रे गोळा करता करता अनेकांची चांगलीच तारांबळ उडतांना दिसत आहे.
प्राप्त माहितीनुसार १५ जानेवारी २०२१ रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीची नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.या निवडणुकीसाठी नामांकनासोबत १८ प्रकारची कागदपत्रे जोडावी लागत आहे. यात आँनलाईन भरलेले नामांकनाची स्वाक्षरी प्रत, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे स्वयघोषणापत्र, जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याची टोकन, मालमत्ता व दायित्व यांचे स्वयंघोषणापत्र, चिन्हांच्या मागणीचे पत्र,मतदार यादीत नाव असल्याची प्रमाणित प्रत, रहिवासी दाखला, शौचालय असल्याचा दाखला, अपत्याचा दाखला, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र,आधारकार्ड,निवडणूक कार्ड,वयाचे प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र,कर व पाणी कर पावती आणि नवीन खाते उघडलेले बँकेचे पासबुक आदी कागदपत्रांचा समावेश आहे.
७२७ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज दाखल
नागभीड तालुक्यात ४३ ग्रा.पं.ची निवडणूक होत असून या निवडणुकीची उत्सुकता वाढत आहे.या ग्रामपंचायतींसाठी ३६३ सदस्यांची निवड करण्यात येणार असून मंगळवारपर्यंत ७२७ उमेदवारांनी आँनलाईन अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवार शेवटचा दिवस आहे. उमेदवार ऑनलाईन अर्ज आपल्या सोयीनुसार दाखल करून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात येत आहेत.
राजकीय पक्षांचे लक्ष
ग्रामपंचायत स्तरावरील निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हांवर वढविल्या जात नसली तरी कोण कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, हे उघड आहे. तरी पण गावातील आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी नागभीड येथील राजकीय पक्षांचे प्रमुख तहसील कार्यालय परिसरात विविध सूचना करीत असल्याचे दिसून येत आहे.