२५ ला दौरा : जलसंपदा व ग्रामविकास मंत्री येणार चंद्रपुरातचंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सुरु असलेला इरई नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम प्रशासन प्रभावीपणे राबवित आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी २५ मे रोजी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे चंद्रपूरला येणार आहेत. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार असून या दौऱ्याची पूर्व तयारी म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी गुरूवारी इरई नदीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, कार्यकारी अभियंता ईश्वर आत्राम व अधिकारी हजर होते. कारखान्याची राख व ओव्हर बर्डनमुळे लुप्त पावलेली इरई नव्याने पूर्नजन्म घेत आहे. प्रसिध्द जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंग यांनी ८ मे रोजी नदीची पाहणी करून समाधान व्यक्त केले होते. गुरूवारी पडोली, दाताळा व चौराळा या ठिकाणी प्रशासनाने सुरु केलेल्या इरई पुनरुज्जीवन कार्यक्रमाची जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील राख व ओव्हर बर्डनमुळे इरई नदीचा मुळ प्रवाह बदलला होता. यामुळे इरईचे मुळ रुप नष्ट होण्याच्या मार्गावर असताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाने इरई नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेतला आहे. गुरूवारी जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून महत्त्वाच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाची प्रगती जाणून घेतली. २५ मे रोजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे इरई पुनरुज्जीवन कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी चंद्रपूरला येणार आहेत. या पाहणी दौऱ्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करून कामाचा आढावा घेतला. याविषयी २५ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी केली इरई नदीची पाहणी
By admin | Updated: May 20, 2016 01:03 IST