अनेक कामगार अकार्यक्षम : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्याचा संशयचंद्रपूर : महानगरपालिकेच्या सफाई विभागात अनेक कामगार अकार्यक्षम असल्याचे लक्षात येताच मनपाने अशा कामगारांची ‘सफाई’ मोहीम आरंभली आहे. काम करण्याची शारिरिकदृष्टया क्षमता नसतानाही अनेक वर्षांपासून असे कामगार काम करीत आहेत. त्यामुळे कामावर विपरित परिणाम होत आहे. काम हातून जायला नको म्हणून या कामगारांनी फिटनेसचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्याचा संशय घेत आज गुरुवारी मनपाने अकार्यक्षम कामगारांची छायाचित्र काढून ओळखपरेड घेतली. आता त्यांची मनपाच्या निगराणीखाली वैद्यकीय तपासणी होणार आहे.चंद्रपूरला नगरपालिका अस्तित्वात असताना १९६७ पासून नगरपालिकेच्या सफाई विभागात कामगार कार्यरत आहेत. ६० रुपये मासिक वेतनापासून ते काम करीत आहेत. १९९० मध्ये या कामगारांना स्थायी करण्यात आले. तेव्हापासून हे कामगार आजपर्यंत महानगरपालिकेत कामच करीत आहेत. महानगरपालिकेच्या सफाई विभागात सध्या सुमारे ४०० कामगार काम करीत आहेत. यापैकी १० कामगार असे आहेत की ज्यातील काही कामगार चार वर्षांपासून कामावर आले नाही. काही कामगार दोन वर्षांपासून तर काही सहा महिन्यापासून कामावर आले नाहीत. त्यामुळे अशा कामगारांना महानगरपालिके नोटीस जारी करीत कारवाईचा इशारा दिला आहे. आता चंद्रपूरचे रहिवासी क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. महानगरपालिकाही अस्तित्वात आली आहे. अशावेळी शहर स्वच्छतेबाबत नागरिकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र अजूनही स्वच्छता विभागात अनेक कामगार वयोवृध्द झाले आहेत. काही अपंग आहेत. तरीही कामावर रुजू आहेत. हे कामगार अकार्यक्षम असल्याने शहर स्वच्छतेच्या कामावर विपरित परिणाम पडत आहे. मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी याबाबतचा आढावा घेतला असता अनेक कामगार अकार्यक्षम असल्याचे आढळून आले. मात्र फिटनेसबाबत या कामगारांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याचा संशय मनपा प्रशासनाला आहे. या संशयावरून मनपाने आज अकार्यक्षम भासणाऱ्या ६० कर्मचाऱ्यांची तपासणी केली. त्यांचे छायाचित्र काढले. आता त्यांना आपल्या निगराणीखाली वैद्यकीय तपासणीसाठी सादर केले जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)
स्वच्छता विभागात मनपाची ‘सफाई’
By admin | Updated: September 11, 2014 23:23 IST