प्रशासकीय कार्यालयात आणि व्यापारी प्रतिष्ठानात ३१६ सीसीटीव्ही कॅमेरे
: अपराध उघडण्यास कॅमेऱ्याची होते मोठी मदत
बल्लारपूर : इलेक्ट्रानिक सिस्टीमच्या युगात सीसीटीव्ही कॅमेऱ्याला मोठे महत्त्व आले आहे. प्रशासकीय सेवा असो की व्यापारी प्रतिष्ठान, येणाऱ्या जाणाऱ्याकडे करडी नजर ठेवण्याची पाळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर आली आहे. कॅमेरे लावण्यात बल्लारपूर व्यापारी, प्रशासन व नागरिक जागृत झाले असून प्रशासकीय कार्यालय, व्यापारपेठ आणि रस्त्यावर ठिकठिकाणी असे एकूण ३१६ कॅमेरे लागल्यामुळे बल्लारपूर शहर कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आले आहे.
शहरातील प्रशासकीय कार्यालयात ७३ सीसीटीव्ही कॅमेरे तर व्यापारी प्रतिष्ठानात २४३ सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. याशिवाय औद्योगिक वसाहतीत व बंगल्यात कॉम्प्लेक्समध्ये लागलेले कॅमेरे वेगळेच आहेत. प्रशासकीय कार्यालयामधून तहसील कार्यालयामध्ये १६, बसस्थानकावर १६, नगर परिषदमध्ये १०, ग्रामीण रुग्णालयात सात पोलीस स्टेशन ४ व रेल्वे स्थानकावर २० असे एकूण ७३ कॅमेरे लागले आहेत तर नगर परिषद फंडातून २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरु आहे व काही मुख्य मार्गावर लागलेले आहे. याशिवाय डेपो टेकडी व वस्तीतील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडे, मॉलमध्ये, किराणा दुकानात कॉम्प्लेक्समध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहे.
बॉक्स
कॅमेऱ्यांमुळे गुन्हे उघडकीस
शहरात लागलेल्या कॅमेऱ्यांमुळे रात्रीच्या अंधारात चोरी करणाऱ्यावर वचक निर्माण होणार आहे. या कॅमेऱ्यामुळे आतापर्यंत अनेक चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी सीसीटीची कॅमेऱ्यांनी पोलिसांना मदत केली आहे. गणपती वॉर्डात झालेली चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळेच उघडकीस आली व पोलिसांना चोर हाती लागले. प्रीत किराणा येथे झालेली चोरी, बेंगळूर बेकरी समोरून पळवलेली बॅग, बटघरे गुरुजींवर लागलेला आरोपही सीसीटीची कॅमेऱ्यामुळेच फेटाळून लावला, अलिकडेच भगतसिंग वॉर्डातील अपहरण नाट्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळेच उघडकीस आले आहे.
कोट
शहरातील कॉम्प्लेक्स व घरात अनेक जणांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. परंतु त्यांच्या कार्यप्रणालीबाबत घरमालकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तो टाळण्यासाठी शहरातील घरमालकांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. जेणेकरून त्यांना आगाऊ माहिती मिळू शकेल
= उमेश पाटील,पोलीस निरीक्षक,बल्लारपूर.