हंसराज अहीर यांचा पुढाकार : ९० कोटींचा भरीव मोबदला चंद्रपूर : भटाळी खुली खाण विस्तारीकरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित न्यायोचित मागण्यांची पूर्तता लवकरच करू, अशी घोषणा सिपेट व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली होती. यावेळी त्यांनी सदर प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी न्याय मिळेस्तोवर राहू, असेही अभिवचन दिले होते. अखेर ना. अहीर यांनी आपला दिलेला शब्द पाळला. १३ मार्च रोजी भटाळी येथील प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याचे धनादेश वितरित करण्यात येणार आहे.ना. अहीर यांनी भटाळी खुली खदान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचा मोबदला, नोकऱ्यांविषयक प्रश्न लावून धरला होता. या प्रश्नाला घेऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन अखेर हा प्रश्न मार्गी लावला आहे. या प्रकल्पात एकूण ४६७ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण होत असून भटाळी प्रकल्पातील शेतकऱ्यांना जुन्या दराने केवळ चार कोटी रुपयांचा मोबदला प्राप्त होणार होता. या मोबदल्यात आता तब्बल २२ पट वृद्धी होऊन सुमारे ९० कोटी रुपयांचा मोबदला व ४०९ प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळणार आहेत.सतत केलेले संघर्षाचे हे फलीत असून आता १३ मार्च रोजी या प्रकल्पग्रस्तांना केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे धनादेशाचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक राजीव रंजन मिश्र, चंद्रपूर वेकोली क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आर. मिश्रा व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भटाळी खाण प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची प्रतीक्षा होती. मात्र ना.अहीर यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढला. (प्रतिनिधी)
भटाळी खाण प्रकल्पग्रस्तांना धनादेश वितरण होणार
By admin | Updated: February 29, 2016 00:38 IST