अड्याळ टेकडीचा चेहरामोहराच बदलला

By Admin | Updated: April 16, 2016 00:41 IST2016-04-16T00:41:54+5:302016-04-16T00:41:54+5:30

शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थानच्या पुढाकाराने भूवैकुंठ अड्याळ टेकडी कात टाकत आहे.

Changed the face of Adalach hill | अड्याळ टेकडीचा चेहरामोहराच बदलला

अड्याळ टेकडीचा चेहरामोहराच बदलला

बांधकाम अंतिम टप्प्यात : गजानन महाराज संस्थानचा पुढाकार
घनश्याम नवघडे नागभीड
शेगाव येथील संत श्री गजानन महाराज संस्थानच्या पुढाकाराने भूवैकुंठ अड्याळ टेकडी कात टाकत आहे. या ठिकाणी अनेक बांधकाम सुरू असून या बांधकामांनी अड्याळ टेकडीचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. अड्याळ टेकडीचे बदललेले हे रूप पर्यटकांच्या आंनदात भर पाडत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने गीताचार्य तुकारामदादा यांनी आपल्या साधनेसाठी अड्याळ टेकडीची निवड केली. या अड्याळ टेकडीवर त्यांनी अखंड १२ वर्ष मौन धारण करून साधना केली. त्यानंतर ते लोकसेवेसाठी बाहेर पडले. संबंध महाराष्ट्रात व देशात त्यांचे समाजसेवेचे कार्य सुरू असताना अड्याळ टेकडीवरही त्यांनी विशेष लक्ष पुरविले. अड्याळ टेकडीवर त्यांनी स्वत:च्या कल्पनेतील सार्वभौम असे एक खेडे तर निर्माण केलेच पण त्याचबरोबर अड्याळ टेकडीच्या पंचक्रोशीत असलेल्या खेड्यांना स्वावलंबनाची दिक्षा देण्याचे कार्यही अविरत केले. अशा या महान आणि आदर्श अशा समाजसेवकांनी ८ जून २००६ रोजी आपले इहलोकीचे कार्य कायमचे संपविले.
त्यांच्या अंत्यदर्शनासाठी संबंध महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. अशाच मान्यवरांपैकी शेगावच्या गजानन महाराज ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत शिवशंकर पाटील यांनी गीताचार्य तुकाराम दादा आणि आपले काय नाते होते, हे सांगून ज्या ठिकाणी दादांना चिरशांती देण्यात आली, त्या ठिकाणी दादांच्या समाधी स्थळासाठी शेगाव संस्थान दोन कोटी रुपये खर्च करणार असल्याची ग्वाही दिली.
शिवशंकर पाटील यांच्या ग्वाहीनुसार दादांच्या समाधीस्थळांचे बांधकाम काही दिवसाअगोदर हाती घेण्यात आले. हे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. समाधीस्थळांचे संपूर्ण बांधकाम राजस्थानी पद्धतीचे असून बांधकामासाठी लागणारा दगड आणि कारागिरसुद्धा राजस्थानातूनच मागविण्यात आले आहेत. समाधीस्थळाच्या पूर्वेला विशाल असे जलाशय, लता वेली आणि विविध जातीच्या वृक्षांनी बहरलेली अड्याळ टेकडी आणि त्या टेकडीवर हे विलोभनीय बांधकाम. त्यामुळे अड्याळ टेकडीचे सौंदर्य आणखीच खुलून दिसत आहे. गीताचार्य तुकारामदादा ज्या ठिकाणी बसून गुरुदेव भक्तांना मार्गदर्शन करीत त्या ठिकाणी भव्य असे सभागृह बांधण्यात आले आहे. आणखी छोटी-मोठी अनेक कामे करण्यात आली आहे. या कामांनी अड्याळ टेकडीचा चेहरा मोेहराच बदलून गेला आहे. ज्यांनी अड्याळ टेकडीला दोन वर्षाअगोदर भेट दिली होती, त्यांनी जर आज भेट दिली तर ही नवलाई डोळ्यात भरल्याखेरीज राहणार नाही.

Web Title: Changed the face of Adalach hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.