राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील सुमारे साडेचार लाख नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी मनपाची आहे. मात्र, पिण्याचे पाणी शुद्ध मिळते काय, हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. त्यामुळे मनपाने कंत्राटदाला दिेलेले काम बंद करून पाणी पुरवठ्याची यंत्रणा स्वत:कडे घेतली. आजमितीस दर महिन्याला १०० ते ११० पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाते. त्याचा अहवाल सकारात्मक आला तरच पाणी पुरवठा सुरू केला जातो.चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेला बरेच वर्षे झाले. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सध्याची पाणी पुरवठा यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे मनपाने अमृत अभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजनेला प्राधान्य दिले. या योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. यासाठी केंद्र शासन ५० टक्के, राज्य व महानगर पालिका प्रत्येकी २५ टक्के वाटा उचलत आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जबाबदारी दिली. पाणी टंचाई निधीतून इरई डॅमवर बंधारा, वीज पंप लावण्यात आला. शहरातील विविध प्रभागात हातपंप व इंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. मात्र, इरई धरणातून होणा-या पाणी पुरवठ्यावरच मनपाची खरी मदार आहे. परिणामी, शहरवासींना पुरविण्यात येणारे पाणी शुद्ध ठेवण्यासाठी मनपाला गंभीरतेने लक्ष द्यावे लागणार आहे. सध्या दोन जलशुद्धीकरण केंद्र सुरू आहेत. १७ प्रभागात १२ पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांचीही नियमित स्वच्छता केली जाते.
१७ प्रभागातून घेतले जातात पाण्याचे नमुनेचंद्रपूर महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरातील १७ प्रभागातून पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा केले जाते. पाण्यातील घटक नागरिकांसाठी पोषक आहे की नाही याची तपासणी केली जाणार असल्याने नमुने घेताना राज्य शासनाने निश्चित केलेल्या निकषांचे पालन केले जाते. याबाबत पाणी पुरवठा अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कर्मचा-यांना प्रशिक्षित करण्यात आले.अशी होते तपासणीतपासणीसाठी सुमारे अर्ध्या लिटरच्या बाटलीत (बाटली १०-१५ वेळा त्याच पाण्याने धुवून) पाणी भरून २४ तासांच्या आत तपासणी प्रयोगशाळेत पाठवावे लागते. यासाठी पक्के बूच असलेली बाटली निवडली जाते. प्रयोगशाळेत तपासण्या करून, पाण्याच्या नमुन्यात रोगजंतू आहेत काय, गढूळ पाणी मिसळले आहे काय, ते पिण्याजोगे शुद्ध आहे काय, याचा अहवाल मिळतो. आता पाणी तपासणीसाठी तयार किट्स मिळतात. ही पट्टी पाण्यात बुडविल्यावर तिचा रंग सेकंदानंतर बदलल्यास जीवाणू आहेत, असे समजावे. याचा अर्थ म्हणजे ते पाणी दूषित आहे.
चंद्रपूरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जलशुद्धीकरणाकडे विशेष लक्ष दिल्या जात आहे.पाणी नुसत्या साध्या डोळयांनी पाहून शुद्ध की अशुद्ध हे सांगणे अवघड आहे. त्यासाठीच प्रयोगशाळेत तपासणी करणे बंधनकारक आहे. प्रयोगशाळेचा अहवाल सकारात्मक आल्यानंतरच पाणी पुरवठा केला जातो. -विजय बोरीकर, अभियंता पाणी पुरवठा, मनपा, चंद्रपूर