चंद्रपूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त उद्या ३१ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. यानिमित्त चंद्रपूर येथे ‘रन फॉर युनिटी’ दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या दौडमध्ये चंद्रपूर शहर एकतेसाठी धावणार आहे. शदौडचे नेतृत्व जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील व मनपा आयुक्त सुधीर शंभरकर करणार आहेत. ३१ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता जटपुरा गेट येथून ‘रन फॉर युनिटी’ दौड काढण्यात येणार आहे. चार ते पाच किलोमीटर अंतराची ही सर्व साधारण दौड असणार आहे. या सोबतच दोन किलोमीटर अंतराची स्पर्धात्मक दौड शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व समाजातील सर्व घटकासाठी आहे. ही स्पर्धा ऐच्छिक असून कोणालाही बंधनकारक नाही. स्पर्धात्मक दौड मध्ये भाग घेण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे नाव नोंदविने आवश्यक असून यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.दौड स्पर्धेनंतर पोलीस परेड ग्राऊंड येथे राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आझाद गार्डन येथे वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारीत चित्रकला व प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना सायंकाळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. दौड स्पर्धा वयोगटानुसार घेण्यात येणार असून यामध्ये भाग घेणाऱ्या महिलांना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी पोलीस विभागाची परेड आयोजित केली जाईल. यामध्ये पोलीस, होमगार्ड व एनसीसी विभागाचा सहभाग राहील. पोलीस परेड झाल्यानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमामध्ये समाजातल्या सर्व घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ, दीपक म्हैसेकर यांनी केले. जिल्हा प्रशासनाने स्पर्धेचे पुर्ण नियोजन केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
राष्ट्रीय एकतेसाठी आज धावणार चंद्रपूरकर
By admin | Updated: October 30, 2014 22:49 IST