लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी (दि. ५) जाहीर झाला. यात नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.१७ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा निकाल ९३.८९ टक्के लागला होता. यंदा त्यामध्ये ४. १७ टक्क्याने घट झाली आहे.
इयत्ता बारावीच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण २७३८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २७१९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण २४२४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची एकूण टक्केवारी ८९.१७ टक्के आहे. जिल्ह्यात यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. परीक्षेला एकूण १३७६८ विद्यार्थी तर १३४२३ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. यापैकी ११७९८ विद्यार्थी व १२४४९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८५.६९ तर, मुलींची टक्केवारी ९२.७४ टक्के आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळांचा निकाल सरस आहे. राजुरा तालुका ९५. ४९ टक्के घेऊन जिल्ह्यातून टॉप ठरला आहे. चंद्रपूर ९३. ६७ टक्के, बल्लारपूर ९०.०५ टक्के, भद्रावती ७३.९२ टक्के, ब्रह्मपुरी ९१.२८ टक्के, चिमूर ६८.७३ टक्के, गोंडपिपरी ९२.३९ टक्के, कोरपना ९३.५५ टक्के, मूल ८४.९२, नागभीड ८५. ८७ टक्के, पोंभुर्णा ९०. ८७ टक्के, सावली ९३. ६५ टक्के, सिंदेवाही ८०.८५ टक्के, वरोरा ९०. ३८ टक्क तर जिवती तालुक्याचा निकाल ९३. ६९ टक्के लागला आहे.