लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरकरांचे लक्ष लागून असलेले २८० कोटी रुपये खर्चुन साकारलेले अत्याधुनिक चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल आता रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे. या रुग्णालयाचे लोकार्पण २२ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे माजी अर्थमंत्री, वन, सांस्कृतिक कार्य व पालकमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प साकारला गेला आहे. टाटा ट्रस्ट, राज्य शासन आणि जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने उभारलेले हे रुग्णालय पूर्वविदर्भातील सर्वांत अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्र ठरणार आहे.
आरोग्य क्षेत्रातील विकासाची नवी दिशा
चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात मागील काही वर्षात मोठी प्रगती झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयानंतर आता कॅन्सर रुग्णालय हा आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प साकारला जात आहे. दरम्यान, १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती, बल्लारपूर व पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालये, मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, तसेच उमरी पोतदार व कळमना येथील स्मार्ट आरोग्य केंद्रे पूर्णत्वास आली आहेत. पूर्वविदर्भातील ग्रामीण, आदिवासी आणि सर्वसामान्य घटकांसाठी हे कॅन्सर हॉस्पिटल नवजीवनाचा आधार व आशेचा किरण ठरणार आहे.
अत्याधुनिक उपचार सुविधा
सुमारे १ लाख चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळावर उभारलेले हे तळमजला अधिक चार मजली रुग्णालय १४० बेड क्षमतेचे आहे. निदान व उपचारासाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणांनी हे केंद्र सुसज्ज आहे. यामध्ये सीटी सिम्युलेटर (सीटी-एस), मॅमोग्राफी, थ्रीडी/फोरडी अल्ट्रासाऊंड, इलास्टोग्राफी, सीटी-१६ स्लाइस, स्पेक्ट, २ लीनियर अॅक्सिलरेटर्स, ब्रेकीथेरपी, डिजिटल एक्स-रे, केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र, रक्तविज्ञान, हिस्टोपॅथोलॉजीसारख्या प्रयोगशाळा सुविधा आहेत. या सर्व सुविधांमुळे हे हॉस्पिटल पूर्वविदर्भातील सर्वात सक्षम आणि संपूर्ण कॅन्सर सुविधा देणारे केंद्र ठरणार आहे.
चंद्रपूरसह पूर्व विदर्भातील रुग्णांसाठी मोठा आधार ठरेल
"चंद्रपूरमध्ये कॅन्सर उपचार केंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. अखेर यश आले. १७ एप्रिल २०१८ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पास मंजुरी मिळाली आणि २६ जून २०१८ रोजी शासन निर्णय निर्गमित झाला. आता ही वास्तू पूर्णत्वास आली आहे. सर्व अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेले हे रूग्णालय चंद्रपूरसह पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यातील रुग्णांना मोठा आधार ठरणार आहे."- सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री तथा आमदार.
Web Summary : Chandrapur's ₹280 crore cancer hospital, equipped with advanced facilities, is set to open. Inauguration by Mohan Bhagwat, with CM Fadnavis attending. The hospital, a Tata Trust, state government, and district mineral fund collaboration, will provide vital cancer care to the region.
Web Summary : चंद्रपुर का ₹280 करोड़ का कैंसर अस्पताल, आधुनिक सुविधाओं से लैस, खुलने के लिए तैयार है। मोहन भागवत द्वारा उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित रहेंगे। टाटा ट्रस्ट, राज्य सरकार और जिला खनिज निधि सहयोग से बना अस्पताल, क्षेत्र को महत्वपूर्ण कैंसर देखभाल प्रदान करेगा।