सेवाज्येष्ठांचा बळी : शिक्षणाधिकारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांचा स्नेहसंबंध ठरणार कारणीभूतबाळापूर (तळोधी) : शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या ११ आॅगस्टच्या समायोजन पत्रानुसार खाजगी शाळांमधील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनाची प्रक्रिया सुरु झालेली आहे. १६ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अतिरिक्त शिक्षकांना यादीवर २० आॅगस्ट पर्यंत शाळेकडून व अतिरिक्त शिक्षकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार २२ आॅगस्टला शिक्षणाधिकारी संबंधीत हरकतीवर निर्णय घेवून सायंकाळी ५ वाजता अंतीम यादी प्रसिद्ध करणार होते. परंतु अतिरिक्त शिक्षकांकडून प्राप्त झालेल्या हरकती मोठ्या प्रमाणात दाखल होवून त्यांची सुनावणी २३ आॅगस्टला सायंकाळी पर्यंत संपलीच नव्हती. त्यामुळे यादी प्रसिद्ध झालीच नाही.२४ व २५ आॅगस्टलाला समायोजनाची फेरी १, २ व ३ पूर्ण करुन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे वेळापत्रक होते. या प्रक्रियेकरिता दिलेला अवधी, सुनावणी दरम्यान नव्याने ठरविण्यात आलेल्या शिक्षकांना हरकती घेण्यास वेळ कमी पडणार आहे. त्यातच शाळेचे मुख्याध्यापक व संस्थासंचालक नेहमीप्रमाणे आपसात झालेल्या आर्थिक व्यवहार, नातेवाईकांना किंवा आपल्या हस्तकांना वाचविण्याकरिता शिक्षणविभागाला पूर्ण दस्तावेज सादर करतीलच असे नाही व नेमका याचाच फायदा शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सेवाज्येष्ठ शिक्षक नियमबाह्य रित्या अतिरिक्त ठरल्यास वावगे वाटणार नाही.आजही अनेक शाळातील, संस्थातील सेवाज्येष्ठता यादीत प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहे. अनेक संस्था प्रमुख आणि मुख्याध्यापकांनी आपल्या मर्जीतील शिक्षकांची शैक्षणिक पात्रता वाढविल्याची नोंद सेवापुस्तिकेत घेतली. मात्र त्याच शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकांची शैक्षणिक पात्रता वाढूनही सेवापुस्तिकेत नोंद न घेतल्याने संबंधीतावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संस्थेतील कर्मचारी नियुक्ती व अनुशेष दाखवण्याची यादी यामध्ये सुद्धा घोळ असून संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी सदर यादीत आपले सगेसोयरे, नातेवाईक व हस्तक यांना सोईनुसार योग्यत्या बिंदू नामावलीवर दाखविले आहे. त्यामुळे अनेक सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ येणार आहे. नेमका संस्थेच्या सेवाज्येष्ठता रोष्टर यादीतील घोळ याचा फायदा घेण्याची योजना शिक्षण विभागातील काही कृपाचार्यानी ठरविली असून जिल्ह्यात त्यांचे हस्तक सक्रिय झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी सजगता दाखवून सेवाज्येष्ठता यादी, जात प्रवर्ग, बिंदू नामावली, नियुक्तीच्या वेळेजी व आजची शैक्षणिक पात्रता, शाळेतील नोकरी करीत असलेला प्रवर्ग, जात वैधता प्रमाणपत्र शिकविणारे विषय आदीचा विचार करुनच अतिरिक्त शिक्षक ठरविण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता राहील, याची खबरदारी घ्यावी अशी माफक अपेक्षा जिल्ह्यातील शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेत सेवाज्येष्ठांवर अन्याय होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 00:47 IST