पाणी पोहोचण्यापूर्वीच प्रकार सुरू : शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणीब्रह्मपुरी : विदर्भातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द धरण होय. तीन पिढ्या लोटूनही या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही. पण दूधवाहीच्या जलसेतूमध्ये पाईपद्वारे पाणी सोडून ओसालामेंढा तलावापर्यंत पाणी नेण्याचे नियोजन सुरू आहे. आता याचेही श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये कमालीची चढाओढ सुरू झाली आहे. या प्रकारावरुन गोसेखुर्दच्या कालव्यात पाणी कमी, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातच पाणी जास्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गोसेखुर्द कालवा या भागातील शेतकऱ्यांना वरदार ठरणार आहे. पण तो दिवस केव्हा उगवणार आहे, हे कुणीही सध्या तरी सांगू शकत नाही. परंतु त्यापूर्वीच वर्तमानपत्रातून श्रेय घेण्याच्या बातम्या वाचायला मिळत असतात. यातून नेत्याची ‘मसिहा’ बनण्याची भूमिका पार पाडण्याचे काम होत असले तरी बिचाऱ्या शेतकऱ्यांना सगळे काही कळत आहे हे लक्षात घेण्याचा नेत्यांना विसर पडलेला आहे. तालुक्यात सध्या पाऊस कमी आहे. जे रोवणी किंवा आवत्या पेरुन पूर्ण झाले होते ते पाण्याअभावी नष्ट होत आहे तर अनेकांची रोवणीची कामे होणे अजूनही शिल्लक आहे. अशा स्थितीत गोसेखुर्दचे पाणी ‘मी सोडून दाखवितो, हे माझे कार्य आहे’. अशा बतावण्या करुन श्रेय घेण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. पण या पाण्याचा खरीप हंगामाला तिळमात्रही फायदा नाही. जे काम आता सुरू करण्यात आले. ते काम उन्हाळ्यात पूर्ण होणे जरुरीचे होते. तेव्हा कुणीही काहीच प्रयत्न केले नाही. पण अचानक दुष्काळाची झळ बसत असल्याने सर्वच झोपेतून जागे होऊन मी, मी म्हणायला सुरुवात झाल्याने काम कामाच्या जागी असून नेत्यांच्या तोंडालाच पााणी सुटले आहे. गोसेखुर्द धरण पूर्ण करणे ही विकासाच्या व जीवनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या बाबीच्या श्रेयावरुन वाद व त्याचे सार्वत्रिकरण करणे हे कोणत्याही शेतकऱ्याला अभिप्रेत नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचे काम सुरू असल्याने नेत्यांच्या कृतीचा संताप व्यक्त केला जात आहे.ज्वलंत प्रश्नासाठी श्रेय लाटण्याचा प्रकार निंदणीय असल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. गोसेखुर्द धरणात कंत्राटदार, अधिकारी, कार्यालये व नेते यांचेच भले झाल्याच्या टिकाही शेतकरी वर्ग दबक्या आवाजात करीत आहे. पाण्यावरुन अनेकांनी माया जमवलीे आहे व शेतकऱ्यांना मात्र आश्वासनावरच जगवले जात आहे, ही वस्तुस्थिती सध्या या भागात दिसून येत आहे. अनेक महात्म्यांनी व समाजसेवकांनी यापेक्षा मोठे कार्य करताना श्रेयाचा वाद कधीही जवळ येऊ दिला नाही. जनताही त्यांचे नाव व स्थान हृदयात ठेवतात. कामे करताना विधायक कामे सहज लोकांच्या नजरेत येत असतात. ती कामे नजरेत भरावी लागत नाहीे. शेतकरी वर्ग कोणत्या अवस्थेला पोहचला आहे, याचे गांभीर्य ओळखून त्यांनी शेतकरी वर्गासाठी गोसेखुर्द पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)
गोसेखुर्दच्या पाण्याचे श्रेय लाटण्याची चढाओढ
By admin | Updated: August 31, 2015 00:47 IST