लोकमत सखी सन्मान अवॉर्डचा सोहळा रंगला
By Admin | Updated: October 23, 2016 01:09 IST2016-10-23T01:09:25+5:302016-10-23T01:09:25+5:30
‘लोकमत’च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविलेल्या रणरागिणीचा लोकमत सखी सन्मान अवार्ड देऊन गौरव करण्यात आला.

लोकमत सखी सन्मान अवॉर्डचा सोहळा रंगला
कर्तृत्ववान रणरागिणींचा गौरव : देखणा व नेत्रदीपक सोहळा
चंद्रपूर: ‘लोकमत’च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविलेल्या रणरागिणीचा लोकमत सखी सन्मान अवार्ड देऊन गौरव करण्यात आला. या निमीत्त झालेल्या शानदार सोहळ्यात अवार्ड विजेत्या महिलांची माहिती देऊन त्यांच्या कार्याचा यथायोग्य सन्मान करण्यात आला. हा आकर्षक, देखणा व नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी आणि अनुभवण्याची संधी ‘लोकमत’ने चंद्रपुरकरांना उपलब्ध करुन दिली.
आयएमए सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवियत्री झाडीकन्या अंजनाबाई खुणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महापौर राखी कंचर्लावार, कृषीजीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सहकार नेते अॅड. बाबासाहेब वासाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रमोद बांगडे, खंडेलवाल ज्वेलर्सचे संचालक राजेश खंडेलवाल, वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय बोढे, लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा, नगरसेवक संजय वैद्य, संगिनी ग्रुपच्या अध्यक्ष अॅड. विद्या बांगडे, इव्हेंट मॅनेजर आतिष वानखेडे, समाजसेविका वर्षा कोठेकर आदी उपस्थित होते.
या रंगारंग कार्यक्रमात स्क्रिनवर कर्तृत्ववान महिलांची माहिती सादर करण्यात आली. चित्रफितीतून त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते सखी सन्मान अवार्ड- २०१६ प्रदान करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात पुरस्कार मानकरी महिलांचे स्वागत केले. या सोहळ्याचे प्रास्ताविक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले. पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे संचालन नागपूर लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन चंद्रपूर जिल्हा इव्हेंटप्रमुख अमोल कडूकर आणि चंद्रपूर जिल्हा सखी मंच संयोजिका पूजा ठाकरे यांनी केले. उपस्थितांचे आभार लोकमतचे चंद्रपूरचे सहायक शाखा व्यवस्थापक विनोद बुले यांनी मानले. किरण बल्की यांनी सुंदर रांगोळ्यांनी सभागृहात आपल्या कलेचा रंग भरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमण बोथरा, मंगेश भांडेकर, ताज कुरेशी, रवी जवळे, अनिकेत चांदेकर, झिलत पठाण, विशाल श्रीकांत खडसे यांच्यासह सखी मंचच्या व युवा नेक्स्टच्या अनेक सदस्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)