चंद्रपूर : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)च्या नव्या नियमानुसार या वर्षी दहावीचा एकही विद्यार्थी नापास होणार नसल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नसून पालकांना तसेच विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र परीक्षेपूर्वीच निर्णय जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गती मंदावेल, अशी भीती काही पालकांना आहे.
कोरोना संकटामुळे या वर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ऑनलाइन अभ्यास करून विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत आहेत. मात्र काही ठिकाणी सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने स्किल इंडिया इनिशिएटिव्ह समोर ठेवून हा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा निकष काय लागणार, असा प्रश्न काही पालकांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात काही शिक्षकांसोबत चर्चा केली असता, सीबीएससीमध्ये गुण देण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे बहुतांश वेळा विद्यार्थी नापासच होत नसून भाषेसारख्या विषयातही आऊटऑफ मार्क मिळवितात. त्यामुळे नापास होण्याची भीती या विद्यार्थ्यांना मुळीच नसल्याचेही शिक्षकांचे म्हणणे आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय असल्यामुळे समाधान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
काय आहे नवीन नियम?
सीबीएसई दहावीचा विद्यार्थी गणित किंवा विज्ञान विषयात नापास झाला आणि त्याने ऐच्छिक विषय, घेतलेल्या कौशल्य आधारित विषयात तो उत्तीर्ण झाला तर त्याला उत्तीर्ण समजले जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फाॅर्मेशन टेक्नाॅलाॅजी, काॅम्प्युटर सायन्स आदी एच्छिक विषय आहेत. यानंतर दहावीची टक्केवारी बेस्ट ऑफ फाइव्ह विषयाच्या आधारावर ठरवली जाणार आहे.
--
जिल्ह्यातील सीबीएसईची आकडेवारी
१२६०
दहावीतील विद्यार्थी
१६
सीबीएसई शाळा
६८५
विद्यार्थी
५७५
विद्यार्थिनी
---
पालकांच्या प्रतिक्रिया
कोरोना संकटामुळे या वर्षी विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण घेता आले नाही. त्यांचे नुकसान टाळण्यासाठी बोर्डाने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र हा निर्णय परीक्षेनंतर घेतला असता तर आणखी चांगले झाले असते.
-रमेश वाघमारे,
गडचांदूर
कोट
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावर दुर्लक्ष होईल. ज्या वेगाने अभ्यास करायला पाहिजे तो वेग मंदावण्याची शक्यता आहे. बौद्धिक कुवत विकसित होण्यासाठी यावर परिणाम पडण्याची शक्यता आहे.
- रोहन शर्मा,
चंद्रपूर
कोट
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही. बोर्डाने घेतलेला निर्णय योग्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील नैराश्य दूर होऊन ते पुन्हा अभ्यासाला लागतील.
- साधना मडावी,
चंद्रपूर