लोकमत न्यूज नेटवर्क पळसगाव (पि) : चंद्रपूर जिल्हा वाघाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात कोअर झोन, बफर झोन, प्रादेशिक वन आहे. या जंगलात उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना सातत्याने घडतात. त्या आगीपासून वनसंपत्ती वाचविताना वन कर्मचाऱ्यांसह, वनमजुरांना मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागते.
अशातच अत्याधुनिक ब्लोअर मशीनचा वापर आता करण्यात येतो. हे ब्लोअर मशीन आग विझवताना धोकादायक ठरू शकते. जंगलातील वनसंपत्तीला लागलेली आग विझवताना वनमजूर पेट्रोलने भरलेल्या ब्लोअर मशीनचे १५ किलो वजन पाठीवर घेऊन आगीचा सामना करतात. या अत्याधुनिक ब्लोअर मशीनच्या वापरामुळे जंगलातील आग झपाट्याने विझण्यास मदत होत असली तरी ती वनमजूर व वनकर्मचारी यांच्या जिवावर बेतणारी ठरू शकते. परंतु वनसंपत्ती वाचवण्यासाठी स्थानिक वनमजूर व वनकर्मचारी जिवाची पर्वा न करता ब्लोअर मशीनच्या साहाय्याने विझवितात, हे विशेष
अशी विझवितात आगआग विझवण्यासाठी खांदा व कमरेवरील चार बेल्ट लावून ब्लोअर मशीन पाठीवर घेतली जाते. हॅन्ड किकने ही मशीन सुरू करण्यात येते. आग विझवताना छोट्या पाइपमधून हवेचा उच्च दाब बाहेर येतो व त्या उच्च दाबाच्या हवेद्वारे समोर असलेली आग आटोक्यात आणली जाते. समोर आगीचा लोंढा व पाठवर पेट्रोल टाकून असलेली मशीन ही धोकादायक ठरू शकते. अशा वेळी मशीन आपत्कालीन बेल्ट काढून समयसूचकतेने अंगाच्या दूर करणे हाच एक उपाय आहे.