गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरनिवडणुकीचे दिवस म्हणजे अविश्रांत परिश्रमाचे दिवस. एक एक दिवस आणि एक एक क्षण महत्त्वाचा असतो. कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत चाललेली असते. प्रत्यक्ष उमेदवार रात्रीचा दिवस करून धडपडत असतात. अशा वेळी उमेदवारांच्या सहचारिणींनी घरी स्वस्थ बसून कसे चालणार ? या धावपळीच्या दिवसात घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून उमेदवारांचे कुटुंबही प्रचारात गुंतले आहे.या संदर्भात जिल्ह्यातील काही उमेदवारांच्या घरी कानोसा घेतला असता, बहुतेक ठिकाणी उमेदवारांच्या पत्नीसह कुटुंबही प्रचारात उतरलेले दिसले.आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सहचारिणी सपना मुनगंटीवार गेल्या आठवडाभरापासून प्रचारात गुंतल्या आहेत. त्या म्हणाल्या, रोज सकाळी ८ वाजता प्रचाराला निघते. ग्रामीण भागात महिला सकाळी भेटत असल्याने ही वेळ योग्य असते. पुन्हा सायंकाळी भेटीचा योग असतो. दुपारच्या वेळी बल्लारपूर, उर्जानगरातील वसाहतीमध्ये संपर्क साधला जातो. अनुभव कसा आहे विचारल्यावर त्या म्हणाल्या, भाऊंच्या कामाची पावती ग्रामीण भागात जागोजागी मिळते. अनेक ठिकाणी आपले होणारे स्वागत बघून ही विजयी रॅली आहे की प्रचारासाठी जनसंपर्क असा प्रश्न आपल्यालाच पडतो. ग्रामीण भागातील समस्या यातून कळतात. त्या नोटींग करुन भाऊंपर्यंत पोहचविण्याचा आपला प्रयत्न असतो.ब्रह्मपुरीतील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांच्या पत्नी किरण वडेट्टीवारही प्रचारात मागे नाहीत. त्यांचाही प्रचार आणि जनसंपर्क सकाळी ९ वाजतापासून सुरू होतो. रात्री १० वाजेपर्यंत हा उपक्रम चालतो. मतदारांच्या घरोघरी जाऊन महिला वर्गाशी संपर्क साधण्यावर त्यांचा भर असतो. गावांमध्ये गेल्यावर तेथील समस्या कळतात, त्या भाऊंपर्यंत पोहचविण्यास मदत मिळते, असे त्या म्हणतात. या प्रचाराच्या कामामुळे कुटूंबाकडे दुर्लक्ष होत नाही का यावर त्या म्हणाल्या, दुर्लक्ष होतेच. पण हे काम सुद्धा कुटुंबाचेच आहे. विजयभाऊ एवढी मेहनत घेतात, मग त्यांच्यासोबत आपण थोडी मेहनत घेतली तर त्यात काय एवढे, असा त्यांचा प्रश्न आहे.चिमूरचे भाजपा उमेदवार कीर्तीकुमार भांगडिया यांचेही कुटूंब प्रचारात उतरले आहे. आमदार मितेश भांगडिया यांच्या पत्नी मेघा भांगडिया, कीर्तीकुमार भांगडिया यांच्या पत्नी सोनल भांगडिया, आत्या कल्पना हेडा, संगीता मालानी, अल्का साबू, मामी शुभांगी महेश काबरा यांच्यासह त्यांचा प्रचार आणि महिला वर्गाशी जनसंपर्क जोरात सुरु आहे. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या या जनसंपर्कातून ग्रामीन प्रश्न समजून घेण्याचे आणि ते उमेदवारापयरंत पोहचविण्याचे काम त्या करीत आहे. राजुराचे आमदार सुभाष धोटे यांचेही कुटूंब गेल्या आठवडाभरापासून असेच प्रचारात गुंतले आहे. आज रविवारीही त्यांचा महिलांशी जनसंपर्क सुरूच होता. आमदार सुभाष धोटे यांच्या पत्नी शुभांगी धोेटे आणि नगराध्यक्ष मंगला आत्राम यांच्यासह अनेक महिला ग्रामीण भागात जनसंपर्कात लागल्या आहेत. राजुरा शहरातील महिला वर्गाशी संवाद साधण्याची धुराच शुभांगी धोटे यांनी उचलली आहे.आपल्या जनसंपर्कातून उमेदवाराला समस्या कळतात, हे तर आहेच; पण निवडणुकीतील प्रचारातून स्थानिक समस्या आपल्याला कळतात, हे अधिक महत्वाचे आहे, असे बहुतेकांचे मत आहे.
उमेदवारांचं कुटुंब रंगलंय प्रचारात !
By admin | Updated: October 12, 2014 23:41 IST