चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेंतर्गत उपविभागीय सिंचाई कार्यालय गोंडपिपरीच्या देखभाल व नियंत्रणात तालुक्यातील वडकुली गावात दोन- सिमेंट प्लग बंधाऱ्याचे काम मंजूर करण्यात आले. सन २०१३-१४ या चालू वर्षातही दोन्ही कामे सुरु करावयाची होती, परंतु सदर कामासाठी निधीप्राप्त होऊनही अजुनपर्यंत बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. असे असले तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात न होताच निधीची मात्र उचल करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अंतर्गत ग्राहक संरक्षण समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ग्रामीण विकास मंत्र्यांकडे केली आहे.सन २०१२-१३ मधील अपूर्ण व अर्धवट सिमेंट प्लग बंधाऱ्याची कामे पूर्ण करण्याचे काम सन २०१३ -१४ या चालू वर्षात जिल्हा परिषदेने हाती घेतले. सध्या सिमेंट प्लग बंधाऱ्याची कामे गोंडपिपरी तालुक्यात जोमाने सुरु आहेत. जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग, गोंडपिपरी अंतर्गत एकूण २७ अशा बंधाऱ्याच्या बांधकामांना मंजुरी मिळाली.गोंडपिपरी तालुक्यातील वडकुली गावात तीन सिंमेट प्लग बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली असून सध्यस्थितीत चेकवडकुली येथील केवळ एकाच सिमेंट प्लग बंधाऱ्याचे काम सुरू आहे. वडकुली येथील दोन बंधाऱ्याचे काम अजुनपर्यंत सुरू करण्यात आले नाही. मात्र सिंचन उपविभागीय कार्यालयात कागदोपत्री सदर दोन्ही कामे सुरु असून काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले आहे. सिंचाई विभागाच्या केवळ कागदावर वडकुली येथील दोन बंधाऱ्याची कामे सुरु असून याच आधारे काम न करताच कामाच्या मोबदल्याची रक्कम (निधी) संबंधिताना वाटपसुद्धा करण्यात आली आहे. वडकुली येथील सिमेंट प्लग बंधाऱ्याचे कंत्राट चंद्रपुरातील भावना दरवनकर यांना देण्यात आले असून करारनामा क्रमांक १७ आहे. वडकुली- दोन येथील बंधाऱ्याचे काम तेथील ग्रामपंचायत स्वत: करीत असून त्यांचा करारनामा क्रमांक ३५ आहे. या दोन्ही बंधाऱ्याचे काम अजुनपर्यंत सुरु झाले नसून देखील भावना दरवनकर यांना कामाच्या मोबदल्यात तीन लाख २२ हजार ८१ इतकी मोठी रक्कम अदा करण्यात आली आहे. असाच प्रकार वडकुली दोन येथील कामातसुद्धा घडला असून, येथील ग्रामपंचायतीला कामाच्या मोबदल्यात सिंचाई विभागाने चार लाख ३८ हजार ६४ एवढ्या रकमेचे वाटप केले आहे. सदर रकमेची उचल करण्यात आली असून गोंडपिपरी येथील उपविभागीय अभियंत्याने प्रत्यक्षात बांधकामाची शहानिशा व मोक्का पाहणी न करता सदर कामे प्रगतीपथावर दाखवून हा प्रकार केला. यात कंत्राटदारांसह आणखी कोण दोषी आहेत याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
वडकुलीतील सिमेंट प्लग बंधारे कागदावरच !
By admin | Updated: September 1, 2014 23:29 IST