बल्लारपूर: येथील नगरपालिका प्रशासनाने शहरातीलअंतर्गत रस्ते रुंदीकरण करण्याचे काम सुरु केले आहे. यासाठी रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविले जात आहे. त्यानुसार गुरूवारी शहरातील कला मंदिर चौकापासून कादरिया मस्जिदकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यासाठी शेकडो घरावर बुलडोजर चालविण्यात आला. नगरपालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईत रस्त्यालगतच्या व्यावसायिकावर यामुळे बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.येथील कलामंदिर चौकापासून पेपर मिल वसाहतीच्या सदनिकांपर्यंत उदरनिर्वाहासाठी अनेकांनी छोटेमोठे व्यवसाय थाटले आहेत. अतिक्रमण मोहिमेमुळे अशा व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट ओढावले. विशेष म्हणजे नगरपालिका प्रशासनाने या भागातील रहिवाशांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीसच्या माध्यमातून कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बल्लारपूर शहराला स्मार्ट शहराचा दर्जा देण्याचा संकल्प राज्यकर्त्यांनी केला आहे. त्याच गंभीरतेने प्रशासनाने शहराचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे. (शहर प्रतिनिधी)
बल्लारपुरात चालला शेकडो घरांवर बुलडोजर
By admin | Updated: May 20, 2016 00:58 IST