BSNL's training..tring..bnd | बीएसएनएलची ट्रींग..ट्रिंग..बंदच
बीएसएनएलची ट्रींग..ट्रिंग..बंदच

ठळक मुद्देअनेक कार्यालयातील कामकाजावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : बीएसएनएलने महावितरणचे देयक सहाव्या दिवशीही अदा न केल्याने बीएसएनएलची सेवा बंद आहे. परिणामी बीएसएनएलच्या ग्राहकांची चांगलीच परवड सुरू आहे.
चार लाख ३ हजार ४१० रूपयांचे देयक अदा न केल्याने वीज वितरण कंपनीने बीएसएनएलचा विद्युत पुरवठा गुरूवारीच खंडित केला. या बाबीस आता सहा दिवसांचा कालावधी होत आहे. परिणामी नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायती, बँका, पतसंस्था, सेतू सुविधा केंद्र आदींचे कामकाज ठप्प झाले. नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे.
याबाबतचे वृत्त 'लोकमत' मध्ये आल्यानंतर जि. प. सदस्य संजय गजपुरे यांनी अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात ही बाब आणून दिली व या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ बीएसएनएलचे सीजीएम पाटील यांना दूरध्वनीद्वारे धारेवर धरत तत्काळ देयक अदा करण्याचे निर्देश दिले. तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंता बोरसे यांना दूरध्वनी करून होणारी गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने मार्ग काढण्याचे निर्देश दिले. केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनासुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या विषयात लक्ष देण्याची विनंती केली.
दरम्यान सुत्राच्या माहितीनुसार महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून देयक अदा करण्याची किंवा तशी हमी देण्याची विनंती केली. पण नागभीड येथील प्रभारी अधिकाºयाने अशी हमी देण्याचा अधिकार मला नाही, असे सांगून असमर्थता दर्शविल्याचे समजते. दरम्यान बीएसएनएलच्या या वेळकाढू धोरणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बीएसएनएलने देयक अदा करून सेवा सुरळीत करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.


Web Title: BSNL's training..tring..bnd
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.