खडसंगी : व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी भारतामध्ये दिडशे वर्षे राज्य केले. इंग्रज राजवटीचा कारभार चालविण्यासाठी इंग्रजांनीही गावागावांत कारभार चालविण्यासाठी ग्रामपंचायती निर्माण केल्या. स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेल्या चिमूर क्रांती नगरीत १९४२ ला ग्रामपंचायतीची स्थापना केली. मात्र वाढलेली लोकसंख्या पाहता ग्रामपंचायतीतून चालविण्यास अडथळा होत होता. त्यामुळे नुकताच राज्य शासनाने चिमूर ग्रामपंचायत विसर्जीत करून नगरपरिषद स्थापनेची कार्यवाही सुरू केली. आता चिमूर क्रांती नगरीतील इंग्रज राजवटीतील ग्रामपंचायत इतिहासजमा होणार असुन सरपंचाऐवजी आता नगराध्यक्ष गावाचा कारभार चालविणार आहे. देशाचा किंवा संस्थानांचा कारभार एका ठिकाणावरून चालविण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे सत्तेचे विकेंद्रिकरण करून गावागावांत लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत तथा तालुकास्तरावर पंचायत समिती व जिल्हास्तरावरून जिल्हा परिषदेमार्फत कारभार चालविला जातो. यासाठी चिमूर गावांत त्यावेळेची लोकसंख्या विचारात घेवून इंग्रज राजवटीत सन १९४२ मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली होती.या पहिल्या निवडणुकीत ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच ना.ह. भलमे यांनी एक डिसेंबर १९४२ ते ९ आॅगस्ट १९४८ पर्यंत कार्यभार चालविता. दुसरे सरपंच फ.ल. कामडी यांनी स्वातंत्र्यानंतर कारभार चालविला तर आजपर्यंत चिमूर क्रांती नगरीत २६ सरपंचानी गावाचा कारभार सांभाळला. चिमूर ग्रामपंचायतीची वाढती लोकसंख्या व अनेक वर्षांपासून चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी येथील नागरिक करित आहेत. मात्र जिल्ह्याच्या निकषात चिमूर तालुका बसत नाही. त्यामुळे ही मागणी मागे पडली आहे. मात्र भाजप-सेना युती शासनाने चिमुरातील जनतेची मागणी लक्षात घेता चिमूर ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्याकरिता शासनस्तरावर हालचाली सुरू केल्या. या इंग्रजकालिन राजवटीत सुरू झालेल्या ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच म्हणून मनिष नंदेश्वर यांना हा मान मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.मागील काँग्रेस सरकारने तालुकास्तरावर असलेल्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील अनेक तालुकास्तरावरील मोठ्या ग्रामपंचायतीसुद्धा येत्या काही महिन्यात इतिहासजमा होणार आहेत. मात्र चिमूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतीची घोषणा माजी मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र नगर पंचायतीला जनतेचा विरोध असल्याने चिमूर नगर परिषदेची कारवाई शासनस्तरावर सुरू झाली आहे. स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेल्या चिमूर नगरीत १९४२ ला ग्रामपंचायतीची स्थापन झाली. या ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्य असुन याच ग्रामपंचायतीने चिमूर शहरातील पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्यसुद्धा दिले आहेत. चिमूर शहरातील लोकसंख्या, मागे पडलेला विकास लक्षात घेता चिमूर ग्रामपंचायतीला नगर परिषद बनवण्याची मागणी जुनीच होती. या मागणीचा पाठपुरावा सातत्याने करण्यात आल्याने चिमूर ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळणार आहे. याकरिता वडाळा पैकु सोनेगाव काग, कवडशी अशा ग्राम पंचायतीचा समावेशसुद्धा नगर परिषदेमध्ये होणार असुन या गावच्या ग्रामपंचायतीही इतिहासजमा होणार आहे.स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेली इंग्रज राजवटीतील ७३ वर्षाआधी १ डिसेंबर १९४२ ला प्रथम सरपंच विराजमान आलेली ग्रामपंचायत आता काही दिवसात इतिहासजमा होणार असुन चिमूर क्रांतीनगरीचा कारभार आता सरपंचाऐवजी नगराध्यक्ष चालविणार आहे. नगर परिषदेच्या स्थापनेनंतर चिमूर शहराचा विकास होणार असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
ब्रिटिशकालीन ग्रामपंचायत होणार इतिहासजमा
By admin | Updated: March 27, 2015 00:49 IST