ब्रिटिशकालीन वास्तू आजही डौलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 05:00 AM2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:01:11+5:30

ब्रिटिशांनी भारतावर सुमारे दीडशे वर्ष राज्य केले. यादरम्यान, ब्रिटिशांनी अनेक कार्यालये चंद्रपूर जिल्ह्यात स्थापन केले. इंग्रजांनी जिल्ह्यात आसोलामेंढा व घोडाझरी तलाव, उपविभागीय अधिकारी कार्यालय, ठिकठिकाणी विश्रामगृहे, पोलीस ठाणी बांधली. इंग्रजांचे राज्य असताना ते या कार्यालयांचा व विश्रामगृहांचा वापर करायचे. सिंदेवाही व इतर काही ठिकाणी इंग्रजांनी सुंदर बगिचेही तयार केले होते.

British architecture is still in use today | ब्रिटिशकालीन वास्तू आजही डौलात

ब्रिटिशकालीन वास्तू आजही डौलात

Next
ठळक मुद्देकाही इमारतींची भग्नावस्था : काही तलावांनी राखले अस्तित्व अबाधित

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आपल्या देशावर इंग्रजांनी बरेच वर्ष राज्य केले. १९४७ ला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. मात्र यापूर्वी ब्रिटिशांनी अनेक वास्तू आपल्या देशात बांधल्या. चंद्रपूर जिल्ह्यातही ब्रिटिशकालीन अनेक वास्तू आहेत. यातील काही वास्तूंची आता भग्नावस्था झाली आहे तर काही वास्तूंचे नूतनीकरण करण्यात आल्याने ते आजही वापरात आहेत.
ब्रिटिशांनी भारतावर सुमारे दीडशे वर्ष राज्य केले. यादरम्यान, ब्रिटिशांनी अनेक कार्यालये चंद्रपूर जिल्ह्यात स्थापन केले. इंग्रजांनी जिल्ह्यात आसोलामेंढा व घोडाझरी तलाव, उपविभागीय अधिकारी कार्यालय, ठिकठिकाणी विश्रामगृहे, पोलीस ठाणी बांधली. इंग्रजांचे राज्य असताना ते या कार्यालयांचा व विश्रामगृहांचा वापर करायचे. सिंदेवाही व इतर काही ठिकाणी इंग्रजांनी सुंदर बगिचेही तयार केले होते. मात्र यातील अनेक बगिचे आता नामशेष झाले आहेत. सिंदेवाही येथील ब्रिटिशकालीन बगिचा मात्र अद्यापही कायम आहे. या बगिचाची देखभालीअभावी दुरवस्था झाली असली तर हा बगिचा अजूनही इंग्रजकाळाची आठवण करून देतो. इंग्रजांनी बांधलेली पोलीस ठाणी, विश्रामगृहे अजूनही डौलात उभी आहेत. या वास्तू अजूनही वापरात आहेत. मात्र काही कार्यालये, निवासस्थाने भग्नावस्थेत आहे.

चिमूर तालुक्यातील अनेक गावात इंग्रजांनी डाग बंगले बांधले आहेत. त्यामध्ये खडसंगी, कवडशी (डाग) या गावात आजही हे बंगले चांगल्या अवस्थेत आहेत तर चिमुरात इंग्रज काळातील पोलीस स्टेशन इमारत आहे. मात्र ही इमारत जीर्ण झाल्याने नवीन इमारतीत पोलीस स्टेशन स्थलांतर झाले आहे. सोबतच इंग्रज काळात दळणवळणासाठी लोखंडी पूल बनविण्यात आला होता. दुर्दैशेमुळे हा पूल बंद करण्यात आला आहे.

आसोलामेंढाच्या विश्रामगृहाचे नूतनीकरण
जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव मानला जाणारा आसोलामेंढा तलाव इंग्रजांनी निर्माण केला. सोबतच या तलावाच्या मुख्य पाळीवर ब्रिटिश कालीन विश्राम गृह होते. त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे.नूतनीकरण करताना विश्राम गृहाचा दर्शनी भाग जैसे थे ठेवण्यात आला आहे.

१११ वर्षांचे झाले रेल्वेचे कार्यालय
 नागभीड येथे रेल्वेचे जंक्शन आहे. चंद्रपूर, नागपूर व गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या रेल्वे लाईनवर लक्ष ठेवण्यासाठी येथे सहायक मंडळ अभियंता कार्यालयाची निर्मिती ब्रिटिशकाळात करण्यात आली. १९०९ साली हे बांधण्यात आले आहे.नियमित देखभालीमुळे हे सहा.मंडळ अभियंता कार्यालय अजूनही मजबूत आहे. या कार्यालयाच्या भिंती मातीच्या आहे. कार्यालय पूर्णत: कौलारू आहे. या कार्यालयातून कार्यालयीन कामकाज नियमित सुरू आहे.

बल्लारशाह रेल्वे स्थानक मजबूत
बल्लारशाह रेल्वे स्थानकाची इंग्रजांच्या काळात दगडांनी बांधलेली प्रशस्त इमारत आजही उत्तम स्थितीत उभी आहे. या इमारतीच्या कार्यालयीन कामाकरिता एकूण सात खोल्या असून एक मोठे प्रवाशी प्रतीक्षालयही आहे. याच इमारतीला लागून फलाटाच्या दिशेने मोठ्याल्या दगडी खांबावर प्रवाशी शेड आहे. ८० वर्षानंतरही हे सारे मजबुत व सुस्थितीत आहेत. काळाच्या बदलाप्राणे मुख्य इमारतीचा ढाचा तसाच ठेउन नवीन बांधकामाने काही नवीन बदल करण्यात आला आहे.

सिंदेवाहीचे रेस्ट हाऊस धूळखात
सिंदेवाही तालुक्यात ब्रिटिश राजवटीत काही ठिकाणी रेस्ट हाऊस व वॉयरलेस क्वार्टर बांधले. ते आता मोडकडीस येऊन धूळखात आहेत. सिंदेवाही पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले सिंदेवाहीतील रेस्ट हाऊस १९३२ साली ब्रिटिशांनी बांधले. मात्र त्याकडे लक्ष दिले नाही. हे रेस्ट हाऊस मोडकळीस आले आहे.

Web Title: British architecture is still in use today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.