चंद्रपूर : देशात सर्वत्र ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविली जात आहे. यासाठी प्रत्येकजण आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहे. मात्र लोहवाहिनी असलेल्या एसटीमध्ये ही मोहीम अद्यापही पोहचली नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. बसेसमध्ये अस्वच्छता, सीट फाटलेल्या, खुलेआम धूम्रपान केले जात असल्याने प्रवाशांचा जीव गुदमरतो. एकीकडे खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना हव्या त्या सुविधा देत असताना एसटी महामंडळ मात्र आहे ती स्थिती सुधारण्यास तयार नसल्याने महामंडळाला तोटा सहन करण्याची वेळ आली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे महामंडळाच्या गाड्यांवरच प्रवासाचे गणित अवलंबून आहे. तिकिटाचे दर वाढले म्हणून कुरकुर करणारा सर्वसामान्य माणूस नेहमीच प्रवास करण्यासाठी एसटी बसला प्राधान्य देतो. मात्र अनेकवेळा येथील गैरसोयीमुळे नाईलाज होत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बसकडे कोणाचे लक्ष नाही. या बसमधून प्रवास करताना अनेक असुविधा दिसून येतात. काही बसमध्ये चढताक्षणीच दाराचा कोपरा पानांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेला दिसतो. तेथून घाणीला सुरुवात होते. खिडक्या या उलटीने माखलेल्या असतात. वेफर्स, चिप्स खाऊन त्याचे पॅकेट संपूर्ण बसमध्ये उडत असतात. बसमध्ये मोठ्याप्रमाणात माती साचलेली असते. एखादी व्यक्ती चालू गाडीतच मनसोक्त धुम्रपान करताना दिसतो. बसमध्ये बसून धूम्रपान केले अथवा थुंकले, कचरा टाकला म्हणून कोणालाही आजपर्यंत दंड झाला नाही. त्यामुळे प्रत्येक जण बेफामपणे कोणाचीही पर्वा न करता एसटी बस रंगविण्याचे काम करीत असतो. त्यामुळेच लोकवाहिनी असलेली एसटीबस आज घाणीच्या विळख्यात सापडली आहे. बसच्या तुटक्या सीट, फुटलेल्या खिडक्या ही तर नित्याचीच बाब झाली आहे. आज सर्वत्र स्वच्छतेचा नारा दिला जात आहे. देशात कानाकोपऱ्यात स्वच्छता मोहीम आरंभली असताना एसटी महामंडळाला अजून तरी जाग आलेली दिसत नाही. एसटीसाठीसुद्धा स्वतंत्र स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे.
लोकवाहिन्यांमध्ये गुदमरतोय श्वास
By admin | Updated: January 24, 2015 22:50 IST