वरोरा : उपजिल्हा रुग्णालय, वरोरा जखमींना रेफर करणारे रुग्णालय म्हणून मागील काही वर्षांपासून ओळखले जाते. मृतदेह विच्छेदनाकरिता रुग्णालयात आणला, तर त्या मृतदेहालाही वरोरा उपजिल्हा रुग्णालयातून रेफर टू चंद्रपूर केले जात आहे. मृत्यूनंतरच्या या यातनेमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वरोरा उपजिल्हा रुग्णालयाला वरोरा शहर तसेच तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र, वरोरा, माजरी व शेगाव पोलीस ठाणी जोडण्यात आली आहेत. या रुग्णालयात यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णही उपचाराकरिता येत असतात. वरोरा, शेगाव, माजरी पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारी वाढत आहे. हाणामारी, अपघातातील जखमी, मृतदेहांचे विच्छेदन वा आरोपींची तपासणी याच रुग्णालयातून केली जाते. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयावर मोठा ताण असतो. सध्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बऱ्यापैकी नियुक्त्या झाल्या असल्याचे समजते. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने बहुतांश रुग्णांना रेफर टू चंद्रपूर केले जाते. तज्ज्ञाअभावी लाखो रुपयांच्या मशीन धूळखात आहेत. अनोळखी मृतदेह पोलिसांनी रुग्णालयात आणल्यानंतर ओळख पटेपर्यंत किंवा काही दिवस वाट बघितले जाते. तोपर्यंत मृतदेह खराब होऊ नये म्हणून एका थंड असलेल्या मशीनमध्ये ठेवला जातो. परंतु ही मशीन मागील काही महिन्यांपासून बंद आहे. ती अद्याप दुरुस्त झालेली नाही. यामुळे मृतदेह चंद्रपूरला पाठवावे लागतात.
हे यंत्र दोन-तीनदा दुरुस्त करण्यात आले. काही दिवस चालल्यानंतर ते बंद होते. नवीन यंत्र द्यावे, याकरिता वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे.
डॉ. अंकुश राठोड, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा.