वरोरा : तालुक्यातील काही घाटांचे लिलाव झाले, तर काही घाटांचे लिलाव अद्याप झाले नाहीत. अशा घाटांमधून मशनरीचा वापर करून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेती काढली जात आहे. अशातच एका बोटीने रेती काढत असताना या बोटीला चक्क एक मृतदेह अडकला. यामुळे खळबळ उडाली आहे. मृतकाची ओळख अद्याप पटली नाही.
वरोरा तालुक्यातील वाळकेश्वर, आमली, बोरी परिसरातून वर्धा नदी वाहते. नदीच्या त्या बाजूला यवतमाळ जिल्हा आहे. या घाटाचा लिलाव झाला नाही. त्याचा फायदा घेत मागील काही महिन्यांपासून अवैधरीत्या रेती काढली जात आहे. बोट व जेसीबी मशीनचा रेती काढताना वापर केला जात असल्याने नदीमध्ये मोठमोठे खड्डे तयार होतात. नदीमध्ये जाणाऱ्यांना याचा अंदाज येत नाही. मागील काही दिवसांपूर्वी जनावराच्या मागे पाण्यातून जाताना खड्ड्यात अडकल्याने एका इसमाचा मृत्यू झाला होता. त्यावर बरेच वादंग झाले. त्यामुळे काही काळ अवैधरीत्या रेती काढण्याचे काम बंद होते. त्यानंतर ते परत सुरू झाले. अवैध रेती वाहून नेताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहेत. ग्रामस्थांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या; परंतु त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे दिसून येते. आता तर अवैधरीत्या रेती काढणाऱ्या बोटीलाच मृतदेह अडकून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही; परंतु यामध्ये प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोट
गावकऱ्यांची तक्रार आल्यास अवैध रेतीचा उपसा करणाऱ्यांवर कारवाई करू.
-सुभाष शिंदे, उपविभागीय अधिकारी वरोरा