राजुरा तालुका : आठ हजारांची लाच लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा/रामपूर : राजुरा तहसील कार्यालयाचा एक मंडळ अधिकारी व तलाठ्याला आठ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुरुवारी रंगेहात पकडले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजुरा तालुक्यातील टेर्भुवाही साजाचे तलाठी बी. एफ. राजपूत आणि विरूर स्टेशनचे मंडळ अधिकारी डी.एस. पोडे यांचा समावेश आहे. बल्लारपूर येथील रहिवासी आशिष देवतळे (२८) यांना सिध्देश्वर येथील शेतामधील झाडांची पाहणी करून अहवाल पाहिजे होता. त्यांच्याकडे त्याबाबत आवश्यक दस्तावेज असतानाही कामासाठी विलंब लावण्यात येत होता. त्यावर देवतळे यांनी विचारणा केल्यावर पैशाची मागणी करण्यात आली. त्यांनी तलाठ्याशी आठ हजार रुपयांत तडजोड केली. परंतु त्यांना लाचेचे पैसे द्यायचे नव्हते. देवतळे यांनी चंद्रपूर येथील लाचलुचपत विभागाशी बुधवारी संपर्क साधला. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला. तलाठ्याच्या कार्यालयातच ठरल्यानुसार गुरुवारी दिलीप पोडेला चार हजार व भरतसिंग राजपूत याला चार हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर इशारा मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे धाड टाकून दोघांनाही रंगले हात पकडले. ही कारवाई चंद्रपूर येथील लाचलुचपत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी सचिन गेडाम, व्ही.पी. आचेवार, मनोहर एकोनकर, सुभाष गौरकार, महेश मांढरे, संतोष येलपुलवार, भास्कर चिचवलकर यांनी सापळा रचून पटवारी यांना रंगेहाथ पकडले. राजुरा तालुक्यातील काही तलाठ्यांविरूद्ध अनेक तक्रारी असून पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही, अशी ग्रामीण जनतेची बोंब आहे. राजुरा तालुक्यातील अनेक तलाठी मुख्यालयी राहत नाही.
मंडळ अधिकारी व तलाठी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 01:09 IST