भाजपच्या राखी कंचर्लावार नव्या महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:00 AM2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:38+5:30

उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल पावडे आणि काँग्रेसचे अशोक नागापुरे रिंगणात होते. यात भाजपचे राहुल पावडे यांचा २० मतांनी विजय झाला. त्यांना ४२ मते पडली तर काँग्रेसचे नागापुरे यांनाही २२ मतांवर समाधान मानावे लागले. उर्वरित बसपा आघाडीचे अनिल रामटेके, शहर विकास आघाडीचे दीपक जयस्वाल, काँग्रेसचे प्रशांत दानव आणि मनसेचे सचिन भोयर यांनी आपले नामांकन शुक्रवारी निवडणुकीपूर्वी परत घेतले.

BJP's Rakhi Kanchlawar new mayor | भाजपच्या राखी कंचर्लावार नव्या महापौर

भाजपच्या राखी कंचर्लावार नव्या महापौर

googlenewsNext
ठळक मुद्देउपमहापौर राहुल पावडे : काँग्रेसच्या कल्पना लहामगे २० मतांनी पराभूत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. काँग्रेसनेही रणशिंग फुंकल्याने या निवडणुकीची चुरस मागील काही दिवसांपासून वाढली होती. मात्र भाजप सदस्य अखेरपर्यंत एकत्र राहिल्याने भाजपच्या राखी कंचर्लावार यांचा दणदणीत विजय झाला. राखी कंचर्लावार यांना ४२ मते तर काँग्रेसच्या कल्पना लहामगे यांना २२ मते पडली. दोन नगरसेवक गैरहजर राहिले. तर काँग्रेसच्या सुनिता लोढिया यांनी आपले नामांकन परत घेतले.
यासोबत उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल पावडे आणि काँग्रेसचे अशोक नागापुरे रिंगणात होते. यात भाजपचे राहुल पावडे यांचा २० मतांनी विजय झाला. त्यांना ४२ मते पडली तर काँग्रेसचे नागापुरे यांनाही २२ मतांवर समाधान मानावे लागले. उर्वरित बसपा आघाडीचे अनिल रामटेके, शहर विकास आघाडीचे दीपक जयस्वाल, काँग्रेसचे प्रशांत दानव आणि मनसेचे सचिन भोयर यांनी आपले नामांकन शुक्रवारी निवडणुकीपूर्वी परत घेतले.
चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौर पद यावेळी महिलेसाठी (खुला प्रवर्ग) राखीव होते. महापौर पदाच्या खूर्चीवर विराजमान होण्यासाठी इच्छुक नगरसेविकांनी आपली धडपड वाढविली होती. ६६ सदस्यांच्या चंद्रपूर महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत म्हणजे ३७ नगरसेवक आहेत. त्यापाठोपाठ कॉंग्रेसकडे १३, बसपा - ६, राष्ट्रवादी -२, शिवसेना - २, मनसे - २, तर चार नगरसेवक अपक्ष आहेत. विद्यमान महापौर अंजली घोटेकर यांचा कार्यकाळ ३० ऑक्टोबरला संपला. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली होती. चंद्रपूर महापालिका २०१२ ला अस्तित्वात आल्यापासून तीन महापौर बसले. हे तीनही महापौर महिलाच होत्या आणि आता चवथ्यांदाही महिलाच महापौर राहणार हे निश्चित होते. मागील काही दिवसांपासून मनपा वर्तुळातील राजकीय हालचालींना वेग आला होता.
दरम्यान, महापौर पदासाठी भाजपकडून राखी कंचर्लावार तर काँग्रेसकडून सुनिता लोढिया व कल्पना लहामगे यांनी नामांकन दाखल केले होते. उपमहापौर पदासाठी एकूण सहा जणांनी नामांकन दाखल केले. यात भाजपकडून विद्यमान स्थायी समिती सभापती राहुल पावडे, शहर विकास आघाडीकडून दीपक जयस्वाल, बसपा आघाडीकडून अनिल रामटेके, काँग्रेसकडून अशोक नागापुरे, प्रशांत दानव व मनसेकडून सचिन भोयर यांनी आपले नामांकन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. ३७ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे महापौर पदावर भाजपचाच महापौर बसेल, असे जवळजवळ निश्चित होते. तरीही काँग्रेसने आपले उमेदवार महापौर पदासाठी उभे केले. फोडाफोडीचे राजकारण त्यांच्याकडून खेळले जाण्याची शक्यता होती. ऐनवेळी फुटाफुटीचे राजकारण होऊ नये, म्हणून भाजपाने आपल्या सर्व नगरसेवकांना पेंच येथे सहलीला पाठविले. रविवारी दुपारीच सर्व ३७ नगरसेवक पेंचसाठी रवाना झाले. हे नगरसेवक २१ नोव्हेंबरलाच परत आले. जादुई आकडा जुळविण्यासाठी काँग्रेसनेही प्रयत्न केला. मात्र भाजपचा कोणताही नगरसेवक पक्ष आदेशाबाहेर गेला नाही.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या सभागृहात महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या सुनिता लोढिया यांनी आपले नामांकन परत घेतले. भाजपच्या राखी कंचर्लावार आणि काँग्रेसच्या कल्पना लहामगे यांच्यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात राखी कंचर्लावार यांना ४२ तर कल्पना लहामगे यांना २२ मते मिळाली. त्यानंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्यात आली. दरम्यान, दीपक जयस्वाल, प्रशांत दानव, सचिन भोयर आणि अनिल रामटेके यांनी आपले नामांकन परत घेतले.
भाजपचे राहुल पावडे आणि काँग्रेसचे अशोक नागापुरे यांच्यासाठी मतदान झाले. यात राहुल पावडे यांना ४२ तर अशोक नागापुरे यांना २२ मते मिळाली. माजी उपमहापौर अनिल फुलझेले आणि लक्ष्मी कारंगल हे दोन सदस्य गैरहजर होते.

मनपाच्या माध्यमातून चंद्रपूरला प्रगतिपथावर नेणार-मुनगंटीवार
भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित केले होते. चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून चंद्रपूर शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कटिबध्द असून नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर तसेच भाजपाचे सर्व नगरसेवक चंद्रपूर शहराला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वशक्तीने प्रयत्न करतील, अशी प्रतिक्रिया आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. महापौर राखी कंचर्लावार व उपमहापौर राहुल पावडे यांनी माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचीही भेट घेत आशीर्वाद घेतला.

राखी कंचर्लावार यांची दुसरी ‘इनिंग’
चंद्रपुरात २०१२ मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली. त्यानंतर पहिल्या पंचवार्षिकमध्ये काँग्रेसच्या संगिता अमृतकर पहिल्या महापौर बनल्या. अडीच वर्षानंतर म्हणजे २०१५ मध्ये राखी कंचर्लावार या महापौर बनल्या होत्या. त्यानंतर आता दुसºया पंचवार्षिकमध्ये पुन्हा अडीच वर्षानंतर त्यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली आहे. महापौर म्हणून राखी कंचर्लावार या दुसरी इनिंग खेळणार आहेत.

भाजपचा जल्लोष
महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या राखी कंचर्लावार विजयी होताच मनपा इमारतीसमोर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यानंतर वाजतगाजत शहराच्या मुख्य मार्गावरून नवनिर्वाचित महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजप नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

तूर्तास पावडेच स्थायी समितीचे अध्यक्ष
उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल पावडे हे विजयी झाले. मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याचकडे आहे. मार्च महिन्यात स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष या दोन्ही पदावर पावडेच विराजमान असणार आहे.

Web Title: BJP's Rakhi Kanchlawar new mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.