ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार : गोंडी नृत्याची मेजवानीबल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील आदिवासी संस्कृती संवर्धन महिला समितीच्या वतीने स्थानिक पेरसापेन देवस्थान सम्राट चौक येथे क्रांतिसूर्य व आदिवासीचे जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती समारोह रविवारी आयोजित करण्यात आला. यानिमित्त ग्रामस्वच्छता अभियान, बिरसा मुंडा प्रतिमेची मिरवणूक, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार, प्रबोधनात्मक कार्यक्रम, गोंडी नृत्याची मेजवाणी आदी कार्यक्रमाची रेलचेल होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक एकनाथ कन्नाके होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदिवासी जनसंपर्क समितीचे अध्यक्ष मनोहर मसराम, सचिव भोला मडावी, बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनकेश्वर मेश्राम, माजी सभापती अॅड. हरीश गेडाम, कविता मडावी, विसापूरच्या सरपंच रिता जिलठे, उपसरपंच सुनील टोंगे, नामदेव शेडमाके व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना कविता मडावी म्हणाल्या, आदिवासी समाजाने शिक्षणाची कास धरुन वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. समाजाचा विकास साधण्याचे तेच प्रभावी माध्यम आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भगवान बिरसा मुंडाचे ध्येय समोर ठेवा. त्यांचा आदर्श जोपासा, असे त्यांनी सांगितले. अनकेश्वर मेश्राम, भोला मडावी, हरीश गेडाम यांनी बिरसामुंडाचा जीवनकार्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.दरम्यान, समितीच्या वतीने विसारपूरच्या सरपंच रिता जिलठे, उपसरपंच सुनील टोंगे, ग्रामपंचायत सदस्य सचिन टोंगे, अनंता कन्नाके, बुद्धिमान कांबळे, अशोक थेरे, शारदा डाहुले, सुरेखा इटनकर, शशीकला जीवने, मीना जुमनाके, उज्ज्वला कोडापे, सुरेखा कोडापे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवित गोंडी डेमसा नृत्य स्पर्धेने प्रेक्षकांना रिझविले. संचालन प्रवीण सलाम यांनी तर आभार हरीश गेडाम यांनी मानले. यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
विसापूर येथे बिरसा मुंडा जयंती समारोह
By admin | Updated: November 18, 2015 01:15 IST