देवाडा (खुर्द) : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, वृद्धपकाळ योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा फायदा अनेक निराधार गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक व वृद्ध महिला घेत आहेत. मात्र बँकेत जमा करण्यात आलेली रक्कम काढण्यासाठी वरिष्ठ नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावर शासनाने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, वृद्धपकाळ योजना याअंतर्गत प्रतिव्यक्ती ६०० रुपये महिना बँकेत जमा केले जाते. पोंभुर्णा तालुक्यातील लाभार्थ्यांची रक्कम इंडियन बँक शाखेत जमा होत असते. लाभार्थीं याच बँकेतुन पैसे काढतात. मात्र बँकेच्या शाखेने खातेदारांना पुरेशा प्रमाणात बसण्याची व्यवस्था नसल्याने वृद्ध नागरिकांना बँकेच्या बाहेरच भर उन्हात ताडकळत उभे राहावे लागते. संबंधितांना होणारा हा त्रास दूर करण्यासाठी बँकेतील व्यवस्थापकांनी निराधारासाठी आठवड्यातून एक दिवस त्यांची रक्कम देण्यात येते. त्यामुळे संबंधित बँकेच्या समोर नागरिकांची गर्दी होत असते. दैनंदिन व्यवहार करणाऱ्या लाभार्थ्यांना अवघड होत आहे. सदर बँक ही भाड्याने घरात असल्याने त्याठिकाणी जागेची कमतरता असुन लाभार्थी रस्त्यावर गर्दी करीत असल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. याठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.अनेक ग्राहकांना बँकेची स्लिप भरण्याविषयी माहितीच नसल्याने दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. शासनाच्या वतीने लाखो रुपये बँकेत जमा केले जाते. याचा सर्वाधिक फायदा बँकेला कमीशनच्या माध्यमातून होत असते. येथील बँकेच्या शाखेत निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करून देण्यासाठी बँकेच्या समोरील भागात शेड बसविण्यात यावा तसेच स्लिप भरण्यासह पैसे काढण्यापर्यंतचे व्यवहार बँकेच्या माध्यमातूनच करण्यात यावे. अशी मागणी निराधार वृद्धांकडून केली जात आहे. तसेच या बँकेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी संपुर्ण सुविधा आहेत. परंतु लाभार्थ्यांसाठी साधी पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली नसल्याने त्या व्यवस्थेकडे सुद्धा संबंधित बँकेच्या व्यवस्थापकांनी लक्ष देऊन पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
निराधार योजनेतील लाभार्थी त्रस्त
By admin | Updated: July 1, 2014 01:24 IST