रवी जवळे/मंगेश भांडेकर चंद्रपूरचंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या शहरात दररोज हजारो लोक बाहेरगावांवरून येत असतात. त्यामुळे शहरात आॅटोरिक्षांची संख्याही कमालीची वाढली आहे. शहरातील दोन हजार ७०० व ग्रामीण भागातील सुमारे ५०० आॅटोंचा पसारा दररोज शहरात असतो. या आॅटोंसाठी महापालिकेकडून ठिकठिकाणी वाहनतळाची व्यवस्था केली आहे. मात्र या वाहनतळांवर एकही सुविधा उपलब्ध करून देण्याचे सौजन्य महापालिकेने आजवर दाखविले नाही. दुसरीकडे आॅटोरिक्षाचालकांवर कुणाचाही वचक नाही. त्यामुळे संपूर्ण शहरच आॅटोरिक्षांचे पार्र्कींग झोन असल्यागत वाट्टेल तिथे आॅटो पार्क करून वाहतुकीचा खोळंबा केला जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे. आॅटोरिक्षांच्या या बेलगाम पार्र्कींगला कोण वठणीवर आणणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चंद्रपूरला महानगर पालिकेचा दर्जा प्राप्त झाला आहे. लोकसंख्या वाढत असली तर शहराचा विस्तार म्हणावा तसा झालेला नाही. मध्यभागीच शहर एकवटले आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे दररोज बाहेरगावावरून येणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यांना कामानिमित्त वेळोवेळी आॅटोरिक्षांची गरज पडते. त्यामुळे आॅटोरिक्षांची संख्याही अलिकडे झपाट्याने वाढली आहे. चंद्रपुरात दोन हजार ७०० आॅटोरिक्षा आहेत. याशिवाय ग्रामीण भागातून चंद्रपुरात दररोज सुमारे ५०० आॅटोरिक्षा येतात. या आॅटोरिक्षांसाठी महानगरपालिकेने शहरातील विविध १७ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था केली आहे. व्यवस्थेच्या नावाखाली केवळ एक फलक लावून महानगरपालिका प्रशासन मोकळे झाले आहे. ‘लोकमत’ने शुक्रवारी या संदर्भात आॅटोरिक्षांच्या विविध वाहनतळांना भेटी देत पाहणी केली असता वाहनतळाचा मुख्य उद्देशच मातीमोल झाल्याचे दिसून आले. आॅटोरिक्षांच्या एकाही वाहनतळावर कसलीही सुविधा नाही. किमान पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह व शेडची व्यवस्था होणे अपेक्षित आहे. मात्र या मुलभुत सुविधीही पुरविण्याचे सौजन्य आजवर महापालिका प्रशासनाने दाखविले नाही. परिणामत: वाहनतळावर आॅटोरिक्षा उभे करण्याचे दायित्व आॅटोरिक्षा चालकांकडूनही दाखविले जात नाही. शहरातील काही वाहनतळावर जाऊन पाहणी केली असता कडाक्याचे ऊन असल्यामुळे सावलीचा आडोसा घेऊन वाट्टेल तिथे आॅटो उभे असलेले दिसून आले. प्रवासी मिळाले पाहिजे, यासाठी काही आॅटोचालक तर वाहनतळावर येऊन रस्त्यावरच उभे असतात. खुद्द वाहनतळांचीच ही अवस्था आहे, तिथे शहरातील इतर रस्त्यावर काय होत असेल, याची कल्पना कुणालाही येऊ शकते.शहरातील पूर्ती बाजार, जटपुरा गेट, झी सेल, आझाद बाग, सराफा लाईन यासारख्या अनेक ठिकाणी आॅटोंचे पार्र्कींग झोन नाही. तरीही वाट्टेल तिथे आॅटोरिक्षा उभे दिसतात. वाहतूक पोलिसांचे वाहन येताच आॅटोचालक तिथून पसार होतात. वाहतूक शाखेचे वाहन पुढे गेले की पुन्हा तीच स्थिती. यामुळे या रस्त्यांवर वाहतुकीचा नेहमीच खोळंबा दिसतो. आॅटोरिक्षामधील प्रवासी एखाद्या दुकानात गेला असेल तर त्याची वाट पाहत आॅटोरिक्षा दुकानापुढेच थांबून असतो. आॅटोरिक्षाचालकाच्या या मनमानीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
आॅटोरिक्षांची बेलगाम पार्किंग
By admin | Updated: May 9, 2015 01:03 IST