वन विभागाने गस्त वाढवावी : वन्यप्रेमींत आनंदाचे वातावरणमूल : गेल्या डिसेंबर महिन्यात येथील रेल्वेपुलाच्या खाली एका अस्वलाने पिलांना जन्म दिला होता. ही दोन्ही पिले सध्या सुखरुप असल्याची माहिती आहे. आपल्या पिलांसह अस्वल कर्मविर महाविद्यालयाच्या परिसराला लागून असलेल्या जंगलात भ्रमंती करीत आहे. अनेकांना या अस्वलाने पाठीवर घेतलेल्या पिलांसह दर्शन दिले आहे. या सुखद घटनेमुळे वनविभाग आणि वन्यप्रेमींत आनंदाचे वातावरण आहे.डिसेंबर २०१५ मध्ये या परिसरात वावरणाऱ्या एका अस्वलाने मुख्य रस्त्यावरील रेल्वेपुलाच्या खाली दोन पिलांना जन्म दिला होता. महिन्याभराच्या कालावधीनंतर अस्वलाने येथून आपले बस्तान कर्मवीर महाविद्यालयाच्या एका पडक्या इमारतीत मांडले. त्यानंतर अस्वलाने परिसराला लागूनच असलेल्या जंगलाचा मार्ग पकडला. बराच काळ ती या जंगलात होती. जवळपास पाच महिन्यांच्या कालावधीनंतर अस्वलीने आपल्या दोन पिलांना पाठीवर घेऊन या परिसरात भ्रमंती सुरू केली आहे. कर्मवीर महाविद्यालय परिसरात असलेल्या बल्लारपूर पब्लिक स्कूलजवळ अनेकांना अस्वलाने दर्शन दिले आहे. त्यामुळे परिसरात कुतूहलाचे वातावरण आहे. वन्यप्रेमी आणि वनविभागाने ही अतिशय आनंदाची वार्ता असल्याचे सांगितले. दोन्ही पिले मोठी झाली असून आपल्या आईच्या पाठीवर बसून ते भ्रंमतीचा आनंद लुटत आहे. परिसरात फिरणाऱ्या या अस्वलीपासून काहीही धोका नसल्याचे वन्यप्रेमी उमेश झिरे यांनी सांगितले. अस्वल आणि तिच्या दोन पिल्लांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)
पिलांसह अस्वलाचे दर्शन
By admin | Updated: May 20, 2016 01:04 IST