चंद्रपूर : मागील वर्षी कोरोना संकटामुळे तब्बल चार महिने सलून व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे जगण्याचा मोठा प्रश्न या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कारागिरांवर आला होता. यामध्ये काहींनी आपले जीवनही संपविले. दरम्यान, आता पुन्हा व्यवसाय ठप्प झाले असून मागील वर्षीसारखीच वेळ आली आहे. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न या व्यावसायिकांना पडला आहे.
चंद्रपूर शहरात ४९५ च्यावर केशकर्तनालये आहेत. यावर अडीच ते तीन हजारांवर कारागीर काम करीत असून कुटुंबीय त्यांच्यावर अवलंबून आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापासून संपूर्ण राज्यात कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले. तेव्हा व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. आता पुन्हा कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, मागील महिन्यामध्ये संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत व्यवसाय एक दिवस बंद ठेवू, असे सांगितले होेते. त्यानंतर प्रत्येक व्यावसायिक आठवड्यातून एक दिवस आपले दुकान बंद ठेवत होते. यामधून व्यावसायिकांनी आपल्या सुरक्षेसह नागरिकांच्या सुरक्षेचा विचार केला होता. याचा बहुतांश सर्वच केशकर्तनालयांनी पाठिंबा दिला. संघटनेच्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र काढून सर्व केशकर्तनालय एक दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला. या आदेशाची एक-दोघांनी पायमल्ली केल्यानंतर त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला. मात्र आता पूर्ण व्यवसायच ठप्प पडल्यामुळे या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असून हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे बेहाल होत आहेत. यातील काही कारागीर गावखेड्यातील आहेत. शहरात त्यांनी खोली करून आपला संसार सुरू केला. मात्र पुन्हा जुनीच स्थिती आल्यामुळे करायचे काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, काही व्यावसायिकांनी भाडेतत्त्वावर गाळा घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. तर काहींनी बँकेकडून कर्ज घेत व्यवसाय सुरु केला आहे. मात्र आता व्यवसाय बंद राहणार असल्याने बँकेकडून घेतलेले कर्ज कसे भरायचे, कुटुंब कसे चालवायचे, असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत.
बाॅक्स
भाडे निघणेही झाले कठीण
कोरोनामुळे मागील वर्षी व्यवसाय बुडाला. ऑक्टोबर महिन्यात शासनाने अटी, शर्ती ठेवून व्यवसाय करण्याची परवानगी दिली. मध्यंतरी व्यवसाय व्यवस्थित सुरू असताना पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे आणखी या व्यावसायिकांवर दुकान बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. काहींना दुकान भाडे, बँकेचे कर्ज, वीज देयके, दुकानातील कारागिरांचे पगार देणे अवघड झाले आहे. या व्यावसायिकांना शासनाने अनुदान देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
बाॅक्स
मागील वर्षी कारागिराची आत्महत्या
मागील वर्षी कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेक जण आर्थिक अडचणी आले. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथील स्वप्निल चौधरी नामक सलून कारागिराने गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या राज्यभरातील पहिली आत्महत्या होती. त्यानंतर राज्यभरात १७ ते १८ जणांनी आत्महत्या केल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेच्या वतीने राज्य सरकारकडे आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. परिणामी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.
बाॅक्स
शहरातील एकूण केशकर्तनालये
४९५
बेघर निवाऱ्यात राहणाऱ्यांची संख्या
१८७
कोट
मागील वर्षी चार महिने व्यवसाय ठप्प होते. त्यानंतर शासनाने विविध अर्टी लावून व्यवसाय करण्यास परवानगी दिली. आर्थिक घडी बसत नाही तोच पुन्हा व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवावा लागत आहे. शासनाने प्रत्येक व्यावसायिक तसेच कारागिरांना मानधन देऊन त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवावा. तसेच मागील वर्षभरात राज्यातील आत्महत्याग्रस्त सलून व्यावसायिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र सरकारने अद्यापही लक्ष दिलेच नाही.
-दिनेश एकवनकर
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, चंद्रपूर
--
कोट
मागील वर्षी लाॅकडाऊनमुळे व्यवसाय बंद होता. आता पुन्हा व्यवसायावर संकट आले आहे. त्यामुळे जगण्याचा मोठा प्रश्न आहे. दुकान बंद असले तरी वीज, पाणी, टॅक्स द्यावाच लागतो. शासनाने सर्व माफ करून प्रत्येक कारागीरांना मानधन द्यावे.
राजू कोंडस्कर
सलून व्यावसायिक
कोट
कोरोना संकटामध्ये मागील वर्षभर शासनाने लादून दिलेले सर्व नियम पाळले. आता पुन्हा दुकान बंद करण्यात आले आहे. व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक घटकांवर परिणाम पडला आहे. शासनाने नियम लावून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी.
-किसन उरकुडकर
दुर्गापूर