मंगल जीवने लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली बॅटरीचलित कार सुविधा चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचे हाल सुरू आहेत.
मध्य रेल्वे नागपूर वाणिज्य विभागातील नॉन-फेअर रेव्हेन्यू (एनएफआर) कक्षाने बल्लारशाह रेल्वे स्थानकावर दिव्यांग व ज्येष्ठ प्रवासी यांना सामान घेऊन डब्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन बॅटरीचलित गाड्या तीन वर्षाच्या कंत्राटावर उपलब्ध करून दिल्या. बऱ्याच दिवस या गाड्या रेल्वे फलाटावर कंत्राटादाराअभावी पडून होत्या. ऑगस्ट २०२४ मध्ये कंत्राट पद्धतीने गाड्या सुरू करण्यात आल्या. दोन महिन्यांत ठेकेदाराला या गाड्यापासून उत्पन्न मिळत नसल्यामुळे बॅटरीचलित गाड्या चालवणे बंद केले. यामुळे स्थानकावर आलेल्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना २, ३, ४ व पाचव्या फलाटावर जाण्यासाठी मोठी फजिती सहन करावी लागत आहे. बल्लारशाह रेल्वेस्थानक मध्य रेल्वेचे शेवटचे व महत्त्वाचे जंक्शन आहे. या स्थानकावर देशभरात धावणाऱ्या सर्व सुपरफास्ट गाड्यांचा थांबा आहे. टीटीआयचा स्टाफ, गार्ड, लोको पायलट बदलतो. गाड्यांची देखरेख केली जाते. त्यामुळे बल्लारशाह रेल्वे स्थानकाला विशेष महत्त्व आहे.
व्यवस्थापकांकडून चौकशीअमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत स्थानकाच्या विकासासाठी ३४ कोटींची तरतूद केली. रेल्वे परिसरात अनेक विकासकामे झपाट्याने सुरू आहे. ही कामे पाहण्यासाठी मागील आठवड्यात विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग आले होते. कारबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली होती.
"मध्य रेल्वेने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेले बॅटरीचलित दोन कार उपयुक्तच होते. या प्रवाशांना फलाटावर चालविण्यासाठी सोईस्कर ठरले; परंतु चार महिन्यांपासून दोनही कार बंद आहेत. ही गैरसोय तातडीने दूर केली पाहिजे."- जयकरणसिंग बजगोती, माजी डीआर यूसीसी सदस्य, रेल्वे वॉर्ड, बल्लारपूर.