बल्लारपूर : सहा वर्षांनंतर आता जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील काही दारू दुकाने उघडली; परंतु मद्यपींना देशी दारू स्वस्त तर बारमध्ये विदेशी दारू महाग मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, काही बारसमोर वाहनतळाची व्यवस्था नाही. त्यामुळे वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने वाहतुकीचा प्रश्न उभा ठाकला आहे. याकडे उत्पादन शुल्क विभागासह पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
बल्लारपूर शहरात मंगळवारी तीन बार व एक देशी दारूचे दुकान सुरू झाले. दारूचा साठा कमी व वेळेची मर्यादा यामुळे दारू पिणाऱ्यांची गर्दी झाल्याचे बघायला मिळाले. याशिवाय बार संचालकांनी बारमध्ये विदेशी दारू विक्रीचे बोर्ड लावले नाही. बारमधून बियर आणि दारू मनमर्जी भावाने विकल्यामुळे दारू पिणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली, तर देशी दारू स्वस्त दरात उपलब्ध झाल्यामुळे मद्यपींनी आनंद व्यक्त केला. अनेक बार रस्त्यावरच आहे, मात्र वाहनतळ नसल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.