देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा येथील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्या भोंगळ कारभाराबाबत वारंवार तक्रार करण्यात येऊनही चंद्रपूरच्या प्रकल्प कार्यालयाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासकीय आश्रम शाळेच्या आवारातील मौल्यवान झाडे मुख्याध्यापकांनी तोडून त्याची परस्पर विक्री केली. यासाठी वन, महसूल व आदिवासी विभागाची परवानगी घेतली नाही, असे चौकशीत सिद्ध झाले. शासकीय मालमत्ता विकूनही संबंधितांवर प्रकल्प कार्यालयाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी त्वरित कारवाई करून संबंधितांवर वन कायदानुसार गुन्हा नोंदवावा, अशी मागणी आहे.मुख्याध्यापक व अधीक्षक या दोघांना संगनमताने २०१३-१४ मध्ये शासनाकडून प्राप्त गणवेश, बुटाची रक्कम कंत्राटदारांशी हात मिळविणी करून गडप केली असल्याचाही आरोप आहे. मुलांना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरवून कंत्राटदाराला लाखो रुपयांचे बिले काढून दिली. याशिवाय शासनाकडून प्राप्त सर्वशिक्षा अभियानाचा निधी परस्पर लांबविली, असे अनेक प्रकार या शाळेत घडत आहेत. परंतु प्रकल्प कार्यालय मात्र याबद्दल कोणतीच कारवाई करीत नसल्याचे दिसून येते. मुख्याध्यापक व अधीक्षक मुख्यालयी राहत नाहीत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बाहेर गावावरून ये-जा करतात. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवन धोक्याचे झाले आहे. शाळेचा दर्जा खालावलेला आहे. शाळा ओसाड झाली आहे. या आश्रमशाळेत मागील तीन वर्षात झालेल्या संपूर्ण गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी, मुख्याध्यापक व आश्रमशाळा अधीक्षक या दोघांवर कारवाई करा अन्यथा या भागातील जनता प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. (वार्ताहर)
प्रकल्प कार्यालयाचा अजब कारभार
By admin | Updated: May 11, 2015 01:11 IST