सिंदेवाही : अवैधरीत्या दारू घेऊन जाणाऱ्या वाहनाने नाकाबंदी करीत असलेल्या सिंदेवाहीचे ठाणेदार परघणे यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र समयसूचकता दाखवून त्यांनी स्वत:ला वाचविले. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.ठाणेदार पी. एन. परधणे यांना एमएच- ३३/ १७७१ या पांढऱ्या स्कॉर्पिओतून दारू येत असून ती नागभीडवरुन मूलकडे जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून त्यांनी ताफ्यासह शिवाजी चौकात नाकाबंदी सुरू केली. काही वेळाने संशयित गाडी चौकाच्या दिशेने आली असता त्यांनी थांबण्यासाठी इशारा केला. परंतु चालकाने न जुमानता सरळ वाहन परघणे यांच्या अंगावर आणले. त्यामुळे खाली पडून त्यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला व उजव्या हाताला दुखापत झाली. गाडीचालक गाडी न थांबवताच पुढे मूलच्या दिशेने सुसाट वेगाने निघून गेला. चालकावर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)
ठाणेदारांना चिरडण्याचा प्रयत्न
By admin | Updated: February 4, 2016 01:00 IST