राजुरा : वेकोलिच्या गोवरी उपक्षेत्रामध्ये २८ जूनच्या रात्री सुमारे २२ हजार रुपये किमतीचे ३६० लिटर डिझेल टाटा सुमोने चोरून नेण्याचा प्रयत्न कामगारांच्या सतर्कतेने उधळला गेला. घटनास्थळी कामगार पोहचताच डिझेल भरलेल्या काही कॅन घटनास्थळावर सोडून चोरट्यांनी टोटा सुमोने पोबारा केला. गेल्या एक महिन्यातील डिझेल चोरीची ही दुसरी मोठी घटना आहे. सुरक्षा विभाग कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच या चोरीच्या घटना घडत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कामगारांनी केली. २८ जूनच्या रात्री दुसरी पाळी संपल्यावर १२ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरटे पांढऱ्या रंगाच्या टाटा सुमोने खाणीतील ओबी बेंचवर अनधिकृतरीत्या पोहचले. त्यानंतर या ठिकाणी उभ्या असलेल्या लोडींंग मशीनच्या टँकमधून डिझेल काढून प्लास्टिकच्या नऊ कॅनमध्ये प्रत्येकी ४० लिटर डिझेल भरले. उर्वरित तीन कॅन भरत असताना तिसऱ्या पाळीत काम करणारे कर्मचारी तेथून जात असताना त्यांना हा चोरीचा प्रकार दिसला. या कामगारांना पाहून चोरट्यांनी डिझेल भरलेल्या नऊ कॅन व रिकाम्या तीन कॅन घटनास्थळीच सोडून टाटा सुमोने पलायन केले. ही घटना पहाटे ३.३० वाजताची असल्याचे प्रत्यक्षदर्शी कामगारांनी सांगितले. आरोपींनी किती लिटर डिझेल सोबत नेले, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, कामगारांनी डिझेल भरलेल्या नऊ कॅन ३६० लिटर किंमत २२ हजार रुपयांचा माल पकडून वेकोलि सुरक्षा विभागाच्या स्वाधीन केले.खाणीमध्ये ओबी बेंचवर अनेक मशिनरी कार्यान्वित आहेत. या मशिनरीच्या सुरक्षेसाठी शंभर मीटर अंतरावर रमेश मत्ते या खासगी कंपनीच्या सुरक्षा गार्डची ड्युटी लावली होती. हाकेच्या अंतरावर डिझेलची चोरी होत असताना हा प्रकार सुरक्षा गार्डला दिसला का नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सुरक्षा गार्ड अशिक्षित असून त्याला लिहिता वाचता येत नसताना सुरक्षा गार्ड म्हणून ठेवले कसे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. चारही बाजूंनी सुरक्षेचा बंदोबस्त असताना अनधिकृत टाटा सुमो खाणीत शिरली कशी, सुरक्षा निरीक्षकाच्या पदाला मान्यता असताना या उपक्षेत्राची जबाबदारी एका हवालदारावर का सोपविली? यापूर्वी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डिझेल चोरीचीच मोठी घटना घडली असतानाच सुरक्षा विभाग एवढा बेसावध कसा, असे अनेक प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. सुरक्षेप्रती स्थानिक व्यवस्थापन उदासिन असल्याची बाब वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांवरून स्पष्ट होत आहे.बाहेरून येणाऱ्या अज्ञात चोरांना चोरी करण्याचे ठिकाण आणि तेथे पोहचण्याचे रस्ते कसे माहीत होतात, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय अशा घटना घडूच शकत नाहीत, असा आरोप करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
वेकोलिच्या गोवरी कोळसा खाणीत डिझेल चोरीचा प्रयत्न उधळला
By admin | Updated: July 1, 2015 01:25 IST